‘संस्थापक’च्या आजी-माजी संचालकांनी पक्षनिष्ठा शिकवू नये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:24 IST2021-04-12T04:24:21+5:302021-04-12T04:24:21+5:30
शिरटे : पालकमंत्री जयंत पाटील आणि राष्ट्रवादीच्या विजयात काडीमात्रही संबंध नसणाऱ्या संस्थापक पॅनेलच्या अविनाश मोहिते व उदय शिंदे यांनी ...

‘संस्थापक’च्या आजी-माजी संचालकांनी पक्षनिष्ठा शिकवू नये
शिरटे : पालकमंत्री जयंत पाटील आणि राष्ट्रवादीच्या विजयात काडीमात्रही संबंध नसणाऱ्या संस्थापक पॅनेलच्या अविनाश मोहिते व उदय शिंदे यांनी आम्हाला पक्षनिष्ठा शिकविण्याच्या फंदात पडू नये, अशी टीका कृष्णाच्या सत्ताधारी गटातील राष्ट्रवादीच्या विद्यमान संचालकांनी केली आहे.
बोरगाव (ता. वाळवा) येथील संस्थापक पॅनेलच्या बैठकीत माजी संचालक उदय शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तथा राजारामबापू कारखान्याचे उपाध्यक्ष विजय पाटील यांच्यावर केलेल्या आरोपांना कृष्णा कारखान्यातील सत्ताधारी गटाचे विद्यमान संचालक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते लिंबाजीराव पाटील, संजय पाटील, अमोल गुरव, सुजित मोरे, दिलीपराव पाटील यांनी प्रसिध्दीपत्राद्वारे प्रत्युत्तर दिले आहे.
ते म्हणाले, बोरगावच्या ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी समर्थकांचे पॅनेल पडावे यासाठी स्वतंत्र आघाडी करणारे उदय शिंदे व अविनाश मोहिते यांनी राष्ट्रवादीबद्दल कुणालाही पक्षनिष्ठा शिकविण्याची गरज नाही. कारण, २०१० ते २०१५ या काळात कारखान्याचे अध्यक्ष असताना अविनाश मोहिते यांनी राष्ट्रवादीसाठी काय केले? तसेच पक्षप्रवेशानंतर जयंत पाटील आणि राष्ट्रवादीच्या विजयात त्यांचा काय सहभाग राहिलाय, हे अगोदर स्पष्ट करावे.
कृष्णा कारखान्यात कधीही पक्षीय राजकारण झालेले नाही. खरंतर विजयबापू स्वत: एका कारखान्याचे उपाध्यक्ष आहेत. त्यामुळे त्यांना चांगल्या-वाईटातला फरक समजतो. कृष्णा कारखान्यात डॉ. सुरेश भोसले यांनी सभासदहिताचा कारभार केला आहे. त्या कामाचे कौतुक विजयबापूंनी केले, तर यात त्यांना पोटशूळ उठायचे कारण काय? असा सवाल राष्ट्रवादीच्या संचालकांनी केला आहे.
यावेळी खरातवाडीचे माजी सरपंच अविनाश खरात, धोत्रेवाडीचे माजी सरपंच प्रदीप माने, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदीप सूर्यवंशी, प्रकाश कदम, प्रकाश पाटील, वसंतराव देशमुख, संभाजी जाधव उपस्थित होते.
चौकट
उदय शिंदे या प्रश्नांची उत्तरे द्यावीत...
तुमच्या सत्तेच्या काळात तोडणी घोटाळा प्रकरणात तुम्हाला अटक झाली होती. या प्रकरणात एम-८० गाडीचा करार दाखवून तुम्ही लाखो रुपयांचे कर्ज कसे घेतले? तसेच नातेवाईकांच्या बोगस व खोट्या कागदपत्रांचा वापर करत हे कर्ज उचलले गेल्याचा ठपकाही तुमच्यावर आहे. त्यामुळे तुम्हाला या पैशांचा हिशोब द्यावा लागणार आहे.
फोटो : ११ शिरटे १
ओळ : कृष्णाच्या सत्ताधारी गटातील राष्ट्रवादीच्या संचालकांनी संयुक्तरित्या प्रसिध्दीपत्रक दिले.