विटा : विटा शहराची सांस्कृतिक परंपरा असणारे ३९ वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन रविवार, २१ फेब्रुवारी रोजी विटा येथे होणार असून, सहकार व कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. साहित्यिक इंद्रजित भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली मुक्तांगण वाचनालयाच्या प्रांगणात साहित्यिकांचा मेळा भरणार असल्याची माहिती भारतमाता ज्ञानपीठचे अध्यक्ष रघुराज मेटकरी यांनी दिली.
मेटकरी म्हणाले, रविवारी या संमेलनाच्या पहिल्या सत्रात सकाळी ९.३० वाजता युवा नेते जितेश कदम यांच्या हस्ते सरस्वती पूजन होणार आहे. यावेळी कवी गोविंद काळे यांच्या अध्यक्षतेखाली व निमंत्रित कवींच्या उपस्थितीत कवी संमेलन होणार आहे. दुसऱ्या सत्रात दुपारी ४ वाजता इंद्रजित भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली मुख्य कार्यक्रम होणार आहे. स्वागताध्यक्ष म्हणून प्रा. डॉ. चंदना लोखंडे, उद्घाटक म्हणून डॉ. विश्वजीत कदम तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार गोपीचंद पडळकर व सद्गुरू श्री श्री साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब कर्णवर-पाटील उपस्थित राहणार आहेत.
संमेलनाच्या तिसऱ्या सत्रात रात्री ९ वाजता हाेणाऱ्या संमेलन समारोपाला आमदार अरूण लाड उपस्थित राहणार असून, प्रा. विश्वनाथ गायकवाड व जयवंत आवटे यांचे कथाकथन होणार असल्याची माहिती मेटकरी यांनी दिली. यावेळी मुक्तांगण वाचनालयाचे अध्यक्ष विष्णूपंत मंडले, भारतमाता ज्ञानपीठच्या सचिव वैशाली कोळेकर, योगेश्वर मेटकरी, डॉ. ऋषिकेश मेटकरी यांच्यासह साहित्य सेवा मंडळाचे सदस्य व मुक्तांगण वाचनालयाचे संचालक उपस्थित होते.
फोटो – १००२२०२१-विटा-इंद्रजित भालेराव.
फोटो – १००२२०२१-विटा-गोविंद काळे.