ग्रामपंचायतींचे घोटाळे ‘पीआरसी’च्या दरबारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2016 01:02 IST2016-06-12T01:02:38+5:302016-06-12T01:02:38+5:30
अहवालच गायब : पाठीराख्यांचीही होणार गोची

ग्रामपंचायतींचे घोटाळे ‘पीआरसी’च्या दरबारी
सांगली : जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींचे दहा ते पंधरा वर्षात लेखापरीक्षणच झाले नसून, काही ठिकाणी ग्रामसेवकांनी दफ्तरच गायब केले आहे. यामुळे घोटाळ्यांचा पुढे तपास होत नसल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. याची सर्व माहिती एका सामाजिक कार्यकर्त्याने पंचायत राज समितीकडे (पीआरसी) दिली आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात पीआरसी समिती येणार असल्यामुळे ग्रामसेवक आणि अधिकाऱ्यांची पंचाईत झाली आहे.
जिल्ह्यातील ७०४ ग्रामपंचायतींपैकी काही ग्रामपंचायतींचे लेखापरीक्षण केल्यानंतर चारशे ग्रामपंचायतींमध्ये तीन कोटींचा अपहार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा अपहार १९८९ ते २००१ या काळातील असून, पंचवीस वर्षांत दोषी ग्रामसेवक, सरपंच यांच्यावर जुजबी कारवाई झाली आहे. याशिवाय, चाळीस ग्रामपंचायतींमध्ये ४० लाख १४ हजार ९४२ रुपयांचा घोटाळा उघडकीस आला होता़ यापैकी माळवाडी (ता़ पलूस), आटपाडी तालुक्यातील उंबरगाव, विठलापूर, शिराळा तालुक्यातील मणदूर, कडेगाव तालुक्यातील तडसर, कवठेमहांकाळ तालुक्यातील रांजणी, चोरोची आणि वाळवा तालुक्यातील वाळवा आदी ग्रामपंचायतींमधील ग्रामसेवकांनी १२ लाख ४३ हजार ५७२ रुपये जिल्हा परिषदेकडे भरले आहेत़ उर्वरित १७ ग्रामपंचायतींमधील आजी-माजी सरपंच आणि ग्रामसेवकांनी घोटाळ्यातील २७ लाख ७१ हजार ३७० रुपये जिल्हा परिषदेकडे भरलेले नाहीत़ पलूस, मिरज, जत तालुक्यातील काही ग्रामपंचायतींमध्ये लेखापरीक्षणासाठी दफ्तरच उपलब्ध नसल्याचा प्रकारही चौकशीत पुढे आला आहे. येथील घोटाळ्याचे आकडे कोटीपर्यंत असल्याचे प्राथमिक चौकशीत दिसत आहे. ग्रामपंचायतीमधील या घोटाळ्याची पुराव्यांसह एका सामाजिक कार्यकर्त्याने पंचायत राज समितीकडे तक्रार केली आहे. समितीनेही या तक्रारीची गांभीर्याने दखल घेतली असून, जुलैमध्ये ही समिती जिल्हा परिषदेला भेट देणार आहे. यावेळी घोटाळ्यातील संबंधित ग्रामपंचायतींची ते पाहणी करणार असल्याचे समजते.
पाणी योजना, रोजगार हमीची कामे, वित्त आयोग आदींचा निधीही थेट ग्रामपंचायतींना मिळत आहे. यामुळे या निधीतून काही ग्रामपंचायतींमध्ये चांगली विकास कामे झाली आहेत. पण, काही गावात वर्षानुवर्षे त्याच त्या गटाची सत्ता आहे. त्यांच्याकडून कोट्यवधीचा घोटाळा झाला आहे.
लोकप्रतिनिधींनी ग्रामसेवकांना हाताशी धरूनच घोटाळा केला आहे. काही गावात तर लोकप्रतिनिधींच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन आठवडा बाजारातील कर, घरपट्टी, पाणीपट्टीच्या पैशावर ग्रामसेवकांनी डल्ला मारल्याच्या तक्रारी आहेत. (प्रतिनिधी)