ग्रामपंचायतीचा निधी अन्यत्र

By Admin | Updated: January 30, 2016 00:16 IST2016-01-29T21:38:46+5:302016-01-30T00:16:12+5:30

जिल्हा परिषदेचा अनागोंदी कारभार : प्रशासनाविरोधात आंदोलनाचे शस्त्र

Gram Panchayat funds elsewhere | ग्रामपंचायतीचा निधी अन्यत्र

ग्रामपंचायतीचा निधी अन्यत्र

चिपळूण : संगमेश्वर तालुक्यातील कडवई ग्रामपंचायतीचा विकासनिधी जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाने अन्य ग्रामपंचायतीकडे वळवल्याने कडवई ग्रामपंचायतीच्या हक्काच्या विकासकामांवर गदा आली आहे. तेराव्या वित्त आयोगाचा ५ लाख १९ हजार ६४४ रुपयांचा निधी हा राजापूर तालुक्यातील देवाचे गोठणे ग्रामपंचायतीच्या नावावर वर्ग झाल्याने कडवई ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
हक्काचा निधी परत मिळवण्यासाठी कडवई ग्रामपंचायतीने वेळोवेळी पाठपुरावा केला. मात्र, जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाने पत्र पाठवण्यापलिकडे कोणतीही कार्यवाही केली नाही. याबाबत पंचायत समिती गटविकास अधिकाऱ्यांना अनेकवेळा पत्रव्यवहार करण्यात आला. मात्र, अद्याप याबाबत कोणतीही कार्यवाही झाली नसल्याने या विभागाच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे.
कडवई ग्रामपंचायत विकासनिधी हा कारभाटले ग्रामपंचायतीच्या कसबा येथील बँक खात्यात जमा झाला असल्याची माहिती आहे. मात्र, जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाने गटविकास अधिकाऱ्यांना पाठवलेल्या पत्रात कडवई ग्रामपंचायत तेराव्या वित्त आयोगाचा निधी देवाचे गोठणे ग्रामपंचायतीला वर्ग झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. कडवई ग्रामपंचायतीचा तेराव्या वित्त आयोगाचा निधी हा ग्रामपंचायतीच्या बँक खात्यात जमा करावा, अशी सूचना गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. मात्र, या सूचनांचे पालन होत नसल्याचा आरोप कडवई ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
कडवई ग्रामपंचायतीने जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना निधीबाबत दि. ३१ डिसेंबर रोजी पत्रव्यवहार केला होता. या पत्रात निधीबाबत माहिती देण्यात आली होती. यामध्ये वितरण झालेल्या अनुदानाचा तपशीलही देण्यात आला होता.
तसेच दि. १७ डिसेंबर रोजी १ लाख १९ हजार ४४० रुपये, दि. २४ जुलै २०१४ रोजी १ लाख ७० हजार ७४८ रुपये, दि. २८ जुलै रोजी १ लाख १९ हजार २२८ रुपये तर अंतिम अनुदानाचे दि. ३० जानेवारी रोजी १ लाख १० हजार २२८ रुपयांचे वितरण करण्यात आले. कडवई ग्रामपंचायतीच्या हक्काचा ५ लाख १९ हजार ६४४ रुपयांचा विकासनिधी कारभाटले ग्रामपंचायतीच्या कसबा येथील बँक आॅफ इंडिया शाखेत जमा झाला असल्याचा पुरावा कडवई ग्रामपंचायतीने पंचायत समिती व जिल्हा परिषद प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले. मात्र, यानंतरही प्रत्यक्ष कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. (प्रतिनिधी)


तीव्र नाराजी : संगमेश्वरचा निधी राजापूर तालुक्यात
संगमेश्वर तालुक्यातील कडवई ग्रामपंचायतीचा तेराव्या वित्त आयोगाचा निधी राजापूर तालुक्यातील ग्रामपंचायतीकडे वळवल्याचा अजब प्रकार घडला आहे. या प्रकारानंतर कडवई ग्रामपंचायतीच्या सरपंचांसह सदस्यही चक्रावून गेले आहेत. या भोंगळ कारभारातबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.


आंदोलनाचा इशारा
कडवई ग्रामपंचायतीचा तेराव्या वित्त आयोगाचा निधी परत मिळाला नाही, तर सर्व ग्रामपंचायत सदस्य व सरपंच पंचायत समिती व जिल्हा परिषद प्रशासनाविरोधात आंदोलन करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

Web Title: Gram Panchayat funds elsewhere

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.