ग्रामपंचायत निवडणुका स्थगित
By Admin | Updated: March 29, 2015 00:43 IST2015-03-29T00:38:42+5:302015-03-29T00:43:13+5:30
कार्यक्रम नंतर जाहीर होणार : भाटवाडी, रामापूरची निवडणूकपूृर्वीप्रमाणेच

ग्रामपंचायत निवडणुका स्थगित
सांगली : निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील ९७ ग्रामपंचायतींच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्याचे शनिवारी सांगण्यात आले. भाटवाडी (ता. वाळवा) व रामापूर (ता. कडेगाव) या दोन ग्रामपंचायतींच्या निवडणुका मात्र पूर्वी ठरल्यानुसार २२ एप्रिलला होणार आहेत. नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर या निवडणुका रद्द करण्यात आल्याचे प्रशासनाकडृन सांगण्यात आले.
जिल्ह्यातील मे ते सप्टेंबर २०१५ या कालावधित मुदत संपणाऱ्या ९९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका २२ एप्रिल रोजी होणार होत्या; मात्र त्यातील ९७ ग्रामपंचायतींच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार लगेच जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.
निवडणूक रद्द झालेल्यांमध्ये मिरज तालुक्यातील २१, जत तालुक्यातील २९, शिराळा २, वाळवा १, कवठेमहांकाळ ११, खानापूर १३, आटपाडी १०, कडेगाव ९ व पलूस तालुक्यातील एका ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
केवळ भाटवाडी व रामापूर ग्रामपंचायतींची निवडणूक मात्र २२ एप्रिलला होणार आहे. त्यांचा कार्यक्रम असा : उमेदवारी अर्ज दाखल करणे : ३१ मार्च ते ७ एप्रिल, अर्जाची छाननी : ८ एप्रिल, उमेदवारी मागे घेण्याची अंतिम मुदत : १० एप्रिल, मतदान : २२ एप्रिल सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३०. मतमोजणी : २३ एप्रिल.
१४ पोटनिवडणुकीसाठी २२ एप्रिलला मतदान
जिल्ह्यातील ९७ ग्रामपंचायतींच्या निवडणुका रद्द झाल्या असल्या तरी यापूर्वी जाहीर केल्याप्रमाणे १४ पोटनिवडणुकींचा कार्यक्रम मात्र ठरल्याप्रमाणे राहील. यामुळे तेथे २२ एप्रिलला मतदान होणार आहे. पोटनिवडणुका होत असलेल्या ग्रामपंचायतींची तालुकानिहाय संख्या अशी- मिरज : २, तासगाव : ५, वाळवा : ३, आटपाडी : १, कडेगाव : २, पलूस : १. (प्रतिनिधी)