ग्रामपंचायत निवडणूक अधिकारी, कर्मचाऱ्यांना मानधनाची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:30 IST2021-02-05T07:30:31+5:302021-02-05T07:30:31+5:30
सांगली : जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा रणधुमाळी संपली असली तरी वरिष्ठ पातळीवरून अद्यापही निधीची पूर्तता न झाल्याने निवडणूक कामकाजात सहभागी ...

ग्रामपंचायत निवडणूक अधिकारी, कर्मचाऱ्यांना मानधनाची प्रतीक्षा
सांगली : जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा रणधुमाळी संपली असली तरी वरिष्ठ पातळीवरून अद्यापही निधीची पूर्तता न झाल्याने निवडणूक कामकाजात सहभागी झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना मानधन मिळालेले नाही.
जिल्ह्यातील १५२ ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया नुकतीच पूर्ण झाली. १८ रोजी प्रत्यक्षात मतमोजणीनंतर निवडणुकीची रणधुमाळी खऱ्याअर्थाने संपली. यंदाच्या निवडणुकीत ४९२६ अधिकारी, कर्मचाऱ्यांची निवडणुकीसाठी नियुक्ती करण्यात आली होती. यंदा काही तालुक्यात जादा ग्रामपंचायतीची निवडणूक होती तर काही तालुक्यात कमी जागांसाठी निवडणुका झाल्या. कमी ग्रामपंचायती असलेल्या तालुक्यात मानधन अदा करण्यात आले आहे, तर इतर तालुक्यात खर्च जादा झाल्याने पुढील निधीची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे आता वरिष्ठ पातळीवरून निधी मिळाल्यानंतर मानधन अदा करण्यात येणार आहे.
चौकट
जिल्ह्यातील १५२ ग्रामपंचायतींपैकी नऊ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने १४३ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक झाली. त्यात ६६२ मतदान केंद्रावर मतदान झाले होते. यात निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, मतदान अधिकारी, केंद्राध्यक्ष, वाहनचालक, शिपाई यांची नियुक्ती करण्यात आली होती.
चौकट
कर्मचाऱ्यांना अनेकदा मानधनाची प्रतीक्षाच
निवडणूक कामाकाजात असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना बहुतांशवेळा मानधनाची प्रतीक्षा करावी लागते. निवडणुकांवर आयोगाकडून होणारे नियंत्रण व इतर कारणामुळे मानधनासह इतर खर्चाची रक्कम मिळण्यास उशीर लागत असतो, तर काही निवडणुकीमध्ये मात्र, तातडीने मानधन अदा केले जाते.
कोट
निवडणुकीसाठी कार्यरत असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या मानधनाची प्रक्रिया लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे. काही तालुक्यांत ग्रामपंचायतींची संख्या कमी असल्याने निधीची पूर्तता झाली आहे. आता प्रशासनाकडे पुन्हा एकदा निधीची मागणी केली आहे. त्यानंतर तातडीने मानधन अदा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
विजया यादव, उपजिल्हाधिकारी