गोविंदराव पानसरे यांना जिल्ह्यात श्रध्दांजली
By Admin | Updated: February 21, 2015 23:59 IST2015-02-21T23:57:26+5:302015-02-21T23:59:20+5:30
वाळव्यात निषेध रॅली : कुंडल, मिरज, आटपाडी, शिराळ्यात राज्य शासनाचा निषेध

गोविंदराव पानसरे यांना जिल्ह्यात श्रध्दांजली
कुंडल : कॉ. गोविंदराव पानसरेंसारख्या सर्वसामान्य नेत्यावर हल्ला झाला. इथून पुढे तरी असे हल्ले होता कामा नयेत. अतिरेकी प्रवृत्तींना वेळच्यावेळी आवर घालण्याची गरज आहे, असे प्रतिपादन क्रांती साखर कारखान्याचे अध्यक्ष अरूण (अण्णा) लाड यांनी केले.
येथील क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड साखर कारखान्यावर ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते, विचारवंत व दिवंगत जी. डी. (बापू) लाड यांचे सहकारी कॉ. पानसरे यांना आज (शनिवारी) श्रध्दांजली वाहण्यात आली. यावेळी अरूण लाड बोलत होते. ते पुढे म्हणाले की, पानसरे अण्णा अजातशत्रू होते. त्यांनी कधीही कुणाचे वाईट केले नाही. ते गोरगरिबांच्या न्याय्य हक्कासाठी चळवळ करणारे नेते होते. ते सामान्यांचा आवाज होते. त्यांच्यावर खुनीहल्ला का झाला, हे समजत नाही. महात्मा गांधींनाही गोळ्या झेलाव्या लागल्या. डॉ. दाभोलकरांसारख्या अनेक व्यक्तींना बलिदान द्यावे लागले. आता पानसरेंना बलिदान द्यावे लागले. हे प्रकार रोखण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.
यावेळी क्रांती दूध संघाचे अध्यक्ष किरण लाड, जिल्हा युवक राष्ट्रवादी अध्यक्ष शरद लाड, कारखान्याचे उपाध्यक्ष महिंद नाना, संचालक पोपटराव संकपाळ, दिलीपराव पाटील, कुंडलिक थोरात, पोपटराव फडतरे, महावीर चौगुले, लालासाहेब महाडिक, पै. श्रीरंग पाटील, आत्माराम हारुगडे, कॉ. शहाजी पवार, सुभाष पवार, कुंडलिक एडके, माजी सरपंच वसंत भाऊ लाड, जगन्नाथ आवटे (तात्या), कार्यकारी संचालक विजयसिंह घोरपडे, वसंतराव लाड, आशिष चव्हाण, चंद्रकांत गव्हाणे, शामराव जाधव उपस्थित होते. (वार्ताहर)