गोविंद पानसरे, दाभोलकर यांचे खुनी मोकाट का?
By Admin | Updated: April 10, 2015 00:33 IST2015-04-09T23:46:23+5:302015-04-10T00:33:31+5:30
पलूसमध्ये चर्चासत्र : महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांना पुरोगामी कार्यकर्त्यांचा सवाल

गोविंद पानसरे, दाभोलकर यांचे खुनी मोकाट का?
पलूस : नरेंद्र दाभोलकर, गोविंदराव पानसरे यांचे खुनी का मोकाट फिरत आहेत? आता पुरोगाम्यांनी आक्रमक होण्याची गरज आहे. कारण विचारांची लढाई वांझोटी असता कामा नये. दाभोलकर, पानसरेंच्या खुनामागे राजकीय फूस असल्याने, झोपेचे सोंग घेणाऱ्यांना जागे करण्याची गरज पुरोगामी कार्यकर्त्यांनी सोमवारी व्यक्त केली.
येथील ज्योती वाचनालयात क्रांतिवीर भगतसिंह, राजगुरू, सुखदेव, तसेच क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांच्या स्मृतिदिनानिमित्त पलूस व कडेगाव तालुका समाजवादी प्रबोधिनी, विद्रोही सांस्कृतिक चळवळ आणि पुरोगामी विचार संघटनेच्यावतीने ‘क्रांतिवीरांचे योगदान’, ‘शहीद कॉ. गोविंद पानसरे व डॉ. दाभोलकर यांच्या खुनाचे रहस्य’, तसेच ‘भूमी अधिग्रहण विधेयक एक भयानक संकट’ या विषयांवर खुले विचारमंथन आयोजित केले होते. चर्चासत्राचे निमंत्रक व्ही. वाय. आबा पाटील यांनी प्रास्ताविक केले.
स्वातंत्र्य हे शोषणमुक्त समाजाचे स्वातंत्र्य असले पाहिजे, अशी शहीद भगतसिंहांची इच्छा होती. नागनाथअण्णांनी देशाला सहकारात आदर्श घालून दिला. चांगले विचार, चांगले लोक प्रतिगाम्यांना नको आहेत. समाजामध्ये दोन विचारप्रवाह असताना, एखादा विचार अग्रक्रमाने मांडला जातो, त्यावेळी प्रतिविचारांना राग येतो. मग प्रतिगामी विचाराचे आक्रमकपणे शस्त्राचा वापर करतात. चार्वाक, तुकोबा ते महात्मा गांधींपासून आजवर हे चालत आले आहे, असे त्यांनी सांगितले.
फक्त हिंदुत्ववादी संघटनांवर टीका करून त्यांना मोठे करून चालणार नाही, तर जात विघटनाचे सूत्र हाती घेण्याची गरज संपतराव पवार यांनी व्यक्त केली. वैदिक कालातीत अस्पृश्यता, गुलामगिरीला विरोध करत मानवतावादी भागवत धर्म संतांनी दिला. पूर्वीपासूनच धर्म प्रत्येकाच्या अंगी भिनल्याने, जो धर्माला हात घालतो तो संपतो. त्यामुळे फक्त आरोप न करता राज्यकर्त्यांवर दबाव आणला पाहिजे, असे ते म्हणाले.
लोकसहमतीशिवाय शेतजमीन व्यावसायिक कारणासाठी अधिग्रहण होता कामा नये. पिकावू शेती उद्योगांना देता कामा नये. बहुराष्ट्रीय कंपन्यांना येथे जमिनी देऊन नदी, हवा, पाणी यांचे प्रदूषण करू देता कामा नये. याबाबत जनजागृती करण्याची गरज प्राचार्य तानाजीराव चव्हाण यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष स्वातंत्र्यसेनानी श्रीरंग यादव व आनंदराव निकम यांनी भगतसिंंह व नागनाथअण्णांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
या चर्चेत प्रा. विठ्ठल सदामते, देवदास कांबळे, अॅड. चंद्रकांत फाळके, प्रा. रेखा पाटील, दादासाहेब पाटील, बी. बी. खोत, किरण शिंदे, कॉ. विशाल, विक्रम, कॉ. मारुती शिरतोडे, अॅड. सतीश लोखंडे, प्रा. रवींद्र येवले, उत्तम सुतार, फाटक गुरूजी, शामराव मोरे यांनी सहभाग घेतला. संदीप नाझरे यांनी आभार मानले. (वार्ताहर)
धमकीचा निषेध
हरित न्यायालयाने सांगली महापालिकेला ठोठावलेला दंड हा पुरोगामी कार्यकर्त्यांचा विजय असल्याने, अॅड. अमित शिंदे, प्रा. आर. बी. शिंदे, रवींद्र चव्हाण, तसेच शहर सुधार समितीच्या अभिनंदनाचा ठराव संदीप नाझरे यांनी मांडला. अॅड. शिंदे यांना धमकावणाऱ्या नगरसेवकाचा निषेध करण्यात आला.