वस्त्रोद्योगाबाबत शासन उदासीन

By Admin | Updated: September 13, 2015 22:51 IST2015-09-13T22:51:12+5:302015-09-13T22:51:38+5:30

जयंत पाटील : शेतकरी विणकरी सहकारी सूतगिरणीची सभा

Government relieves the textile industry | वस्त्रोद्योगाबाबत शासन उदासीन

वस्त्रोद्योगाबाबत शासन उदासीन

इस्लामपूर : राज्यातील युती शासनाची वस्त्रोद्योगाला मदत करण्याची भूमिका नाही. वीज दरवाढीची बिकट समस्या निर्माण झाल्याने वस्त्रोद्योग अडचणीत आला आहे. रोजगार संधी उपलब्ध करून देण्याची मोठी क्षमता असणाऱ्या वस्त्रोद्योगाबाबत सरकारकडून लवकर निर्णय व्हावा, अशी अपेक्षा माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांनी येथे व्यक्त केली.
राजारामबापू वस्त्रोद्योग संकुलातील शेतकरी विणकरी सहकारी सूतगिरणीची १३ वी वार्षिक सभा झाली. यावेळी आ. पाटील बोलत होते. बबन थोटे अध्यक्षस्थानी होते. संकुलाचे अध्यक्ष दिलीप पाटील, ज्येष्ठ नेते रामराव देशमुख, प्रा. शामराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आदर्श कामगार व त्यांच्या गुणवंत पाल्यांचा गौरव करण्यात आला. संचालक रघुनाथ मदने यांना समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल आ. पाटील यांच्याहस्ते सन्मानित करण्यात आले. सभेत विषयपत्रिकेवरील सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले.आमदार जयंत पाटील म्हणाले, बाजारात सध्या मंदी आहे. सूत, कापडाला उठाव नाही. वस्त्रोद्योगापुढे अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. अशावेळी शेतकरी-विणकरी सूतगिरणीने आपल्या यंत्रसामग्रीची कार्यक्षमता वाढवून या अडचणीच्या काळातही मार्गक्रमण करावे.संकुलाचे अध्यक्ष दिलीप पाटील म्हणाले, विजेची दरवाढ, कापूस खरेदी-विक्री नियंत्रणाबाहेर गेली आणि बाजारात सुताला दर नाही, अशा अडचणीत सापडलेल्या सूतगिरण्यांबाबत शासनाने मदतीचे धोरण अवलंबले नाही, तर येत्या दोन महिन्यात राज्यातील सूतगिरण्या बंद पडण्याचा धोका आहे. शेतकरी विणकरी सूतगिरणीने अनेक संकटांवर मात करीत आपला लौकिक कायम ठेवला आहे. सूत उत्पादनासह मूल्यवर्धित प्रकल्पांची उभारणी केली आहे. शासनाने सूत निर्यातीस परवानगी देऊन प्रतिकिलो १० रुपये अनुदान द्यावे. वीजदरात कपात करावी. व्हॅट कराचा कोट्यवधींचा परतावा द्यावा, या मागण्यांसाठी लवकरच मुख्यमंत्र्यांना भेटणार आहोत.
सूतगिरणीचे अध्यक्ष बबन थोटे यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला. विजयकुमार घारगे, महादेव दानवरे यांना ‘आदर्श कामगार’ पुरस्काराने गौरविण्यात आले. वेदांतिका शिंदे, हिमांशू मोरे, सुमित चव्हाण, अथर्व शिंदे, श्रावणी पाटील, सुमित पाटील या गुणवंत पाल्यांचाही सत्कार करण्यात आला. संचालिका रोजा किणीकर यांनी आदरांजली ठराव मांडला. कार्यकारी संचालक हेमंत पांडे यांनी विषयपत्रिकेचे वाचन केले. मुख्य लेखापाल एच. बी. मुलाणी यांनी आर्थिक ताळेबंदाचे वाचन केले.
इस्लामपूर शहर वाय-फाय केल्याबद्दल आ. जयंत पाटील यांच्या अभिनंदनाचा ठराव उपाध्यक्ष सुहास पाटील यांनी मांडला. मोहन आडके यांनी सूत्रसंचालन केले. संचालिका कमल पाटील यांनी आभार मानले.
सभेला बशीर मोमीन, दिलीप वग्याणी, बाळासाहेब पाटील, संजय पाटील, युवराज सूर्यवंशी, धनाजी पाटील, एम. एम. पाटील, अण्णा तगारे यांच्यासह सभासद, संचालक, अधिकारी व कर्मचारी ग्रामस्थ आदी उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Government relieves the textile industry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.