व्यापाऱ्यांनी प्रतिसाद दिल्यास पुनर्वसनाची शासनाची तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:27 IST2021-07-27T04:27:26+5:302021-07-27T04:27:26+5:30
सांगली : दक्षिण महाराष्ट्रातील एक महत्त्वाची बाजारपेठ म्हणून सांगलीचा नेहमीच उल्लेख होतो. मात्र, यातील बहुतांश बाजारपेठेला महापुराचा वारंवार फटका ...

व्यापाऱ्यांनी प्रतिसाद दिल्यास पुनर्वसनाची शासनाची तयारी
सांगली : दक्षिण महाराष्ट्रातील एक महत्त्वाची बाजारपेठ म्हणून सांगलीचा नेहमीच उल्लेख होतो. मात्र, यातील बहुतांश बाजारपेठेला महापुराचा वारंवार फटका बसत आहे. सन २००५, २०१९ आणि आताही या बाजारपेठेला नुकसान सोसावे लागले आहे. व्यापाऱ्यांच्या मदतीसाठी राज्य शासन कटिबद्ध असले, तरी व्यापाऱ्यांनी योग्य प्रतिसाद दिल्यास, त्यांना इतर ठिकाणी पुनर्वसनास राज्य शासनाची तयारी आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी पत्रकार बैठकीत केले.
जिल्ह्यातील पूरस्थितीचा आढावा घेतल्यानंतर, त्यांनी सांगली शहरातील पूरस्थितीची पाहणी केली. आढावा बैठकीनंतर उपमुख्यमंत्री पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
पवार म्हणाले, कोणतीही शक्यता नसताना, धरण क्षेत्रात झालेल्या पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील १०३ गावांना याचा फटका बसला असून, दोन लाखांवर लोकांचे स्थलांतर करावे लागले आहे. या संकटामुळे नुकसान झालेल्या शेतकरी, व्यापाऱ्यांना राज्य शासनातर्फे सर्वतोपरी मदत केली जाईल.
राज्यातील एक अग्रेसर बाजारपेठ म्हणून सांगलीची ओळख आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत वारंवार या बाजारपेठेला पुराचा फटका बसत आहे. यावर सर्वमान्य तोडगा आवश्यक आहे. प्रत्येक वेळी पूर आल्यानंतरच याबाबत चर्चा होते. त्यानंतर, विषय थांबतो. पाणी येते, त्या भागातील व्यापाऱ्यांची भूमिका महत्त्वाची आहे. मात्र, तरीही सांगलीतील व्यापाऱ्यांचा सकारात्मक प्रतिसाद असेल, तर उंच ठिकाणी त्यांचे योग्य ते पुनर्वसन करण्यास राज्य शासन तयार आहे, असेही ते म्हणाले.