सरकारनामा----- तंबूत शिरलेल्या उंटांची गोष्ट
By Admin | Updated: September 18, 2014 23:26 IST2014-09-18T23:05:34+5:302014-09-18T23:26:43+5:30
अगदी २००९ च्या लोकसभा निवडणुकीत पक्षानं ‘कमळ’ गोठवून अपक्षाला पाठिंबा दिला. भाजपची फरफट झाली. तंबू केव्हाच पळवला गेला होता!

सरकारनामा----- तंबूत शिरलेल्या उंटांची गोष्ट
संभाजीआप्पा पवारांनी जनता दलातून भाजपमध्ये प्रवेश केला, तेव्हा काही भाजपेयींनी नाकं मुरडली होती, पण आप्पांची बैठक सांगलीच्या गावभागातच असल्यानं ते पक्षात विरघळून गेले. हळूहळू भाजपचा तंबू त्यांनी मारुती चौकात आणला. पुढं जयंतरावांच्या इशाऱ्यावर त्यांनी भाजपला महापालिका, बाजार समितीत खेळवलं. अगदी २००९ च्या लोकसभा निवडणुकीत पक्षानं ‘कमळ’ गोठवून अपक्षाला पाठिंबा दिला. भाजपची फरफट झाली. तंबू केव्हाच पळवला गेला होता!
यंदा संजयकाका पाटील यांच्या भाजपप्रवेशावेळी आप्पांना तीच भीती होती. आधीच दोघांच्या तालमीचं विळ्या-भोपळ्याचं सख्य, त्यात काका कधी तंबू उचलून नेतील, याचा नेम नाही, त्यामुळं आप्पांनी कडाडून विरोध केला. आप्पांसोबत पक्षातील जुन्या-नव्या (मोडीत निघालेल्या) मंडळींनीही हात-पाय घासले, पण काकांनी तंबूत घुसून खासदारकी मिळवली. आता भाजपचा तंबू काकांच्या इशाऱ्यावर हलायला लागलाय. ज्यांनी काकांना ‘बाहेरचा’ म्हणून हिणवलं, काकांना तिकीट मिळणार नाही, अशी आवई उठवली, तीच मंडळी (संभाजीआप्पा सोडून हं! इतरांची नावं घ्यायलाच हवीत का..?) विजयाचा गुलाल लावून घ्यायला पुढं होती. आता त्या सगळ्यांनाच काकांचा हिसका कळून चुकलाय. हळूहळू काँग्रेस-राष्ट्रवादीतील इतर राहुट्याही या तंबूत यायला लागल्यात. जिल्ह्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचा पसाराच मोठा. नानाविध संस्थांचं जाळं, सत्तेची ऊब आणि कडव्या कार्यकर्त्यांचा जाळ या जोरावर त्यांच्या राहुट्या मजबूत झाल्यात. गावा-गावांपर्यंत पोहोचल्यात. त्यामुळं मोदी लाट येईपर्यंत केवळ नागर संस्कृतीशी मिळतं-जुळतं घेणाऱ्या भाजपेयींची ताकद त्यांच्यापुढं जेमतेमच राहिली. अर्थात जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीनंतरही मूळ भाजपेयींचं ‘इलेक्टिव्ह मेरिट’ वाढलेलं नाही. परिणामी त्यांना काँग्रेस-राष्ट्रवादीतील आयातीवर भरवसा ठेवावा लागतोय. (भाजपवाल्यांचा आव मात्र काँग्रेस-राष्ट्रवादीच्या तंबूंचे कळस कापून आणल्याचा!) लाटेवर आमदारकी मिळवण्यासाठी तिथले कळस स्वत:च कापून घेऊन येणाऱ्यांना आता थांबवताही येईना! संजयकाकांचा प्रवास काँग्रेस, राष्ट्रवादी, दुष्काळी फोरम ते भाजप असा, अजितराव घोरपडे अपक्ष, विकास आघाडी, काँग्रेस, राष्ट्रवादी अशी मजल-दरमजल करत ‘कमळा’कडं आलेले, धनपाल खोत आधी काँग्रेसमधील प्रकाशबापू गट, नंतर मदन पाटील गट, राष्ट्रवादी, कुपवाड विकास आघाडी अशा सत्तेच्या गाड्या बदलत भाजपवासी झालेले, पप्पू डोंगरेंचे तेच, शिवाजीराव नाईक, विलासराव जगताप, पृथ्वीराज देशमुख, दिनकरतात्या, श्रीनिवास पाटील वगैरे कुंपणावरच्या मंडळींची वाटचालही अशीच. ‘विधानसभेचं तिकीट’ हे भाजपप्रवेशाचं मुख्य कारण असलं तरी इतर कारणं व्यक्तिसापेक्ष बदलणारी. आता एवढ्या तयार राहुट्या भाजपच्या तंबूत येत असल्यानं तंबूतले आधीचे-मूळचे लोक कानकोंडे होऊन कोपरे धरून बसलेत, तर काहींनी पुढं-पुढं करत आपणच सगळं घडवून आणल्याचा आव आणलाय. तंबूत येणारी नवी मंडळी वरचढ होणार असल्याचं दिसू लागताच काहींनी सोशीकता दाखवत हातमिळवणी केलीय. ‘सांगता येईना आणि सहनही होईना’, ‘तोंड दाबून बुक्क्यांचा मार’, ‘आपलेच दात आणि आपलेच ओठ’ अशा म्हणी-वाक्प्रचारांचे शब्दार्थ, भावार्थ, व्यंग्यार्थ त्यांना पुरेपूर कळून चुकलेत. जसं देशभरात, तसं सांगलीत. तंबूत शिरलेल्या आणि तंबूच पळवून नेणाऱ्या उंटाची गोष्ट त्यांना ठाऊक आहे, पण करणार काय...?
- श्रीनिवास नागे