गोटखिंडीचे ए. टी. पाटील तात्या : हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:27 IST2021-02-11T04:27:56+5:302021-02-11T04:27:56+5:30

गोटखिंडी गावचे थोर सुपुत्र स्वर्गीय आनंदराव तुकाराम पाटील तात्या तथा ए. टी. पाटील हे शांत संयमी, सुसंस्कृत, मनमिळाऊ, ...

A. of Gotkhindi. T. Patil Tatya: Harhunnari personality | गोटखिंडीचे ए. टी. पाटील तात्या : हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व

गोटखिंडीचे ए. टी. पाटील तात्या : हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व

गोटखिंडी गावचे थोर सुपुत्र स्वर्गीय आनंदराव तुकाराम पाटील तात्या तथा ए. टी. पाटील हे शांत संयमी, सुसंस्कृत, मनमिळाऊ, तत्त्वनिष्ठ अशा बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचा जन्म दि. १५ ऑक्टोबर १९४५ रोजी एका सधन कुटुंबामध्ये झाला. लहानपणापासूनच घरी वडिलांकडे गावचे सरपंचपद असल्याने तात्यांना राजकीय, सामाजिक व शैक्षणिक विषयांचे बाळकडू मिळत गेले. त्यामुळेच गोटखिंडी गावच्या राजकारण, समाजकारणामध्ये गेली ५० वर्षे त्यांनी आपल्या कामाने व कर्तृत्वातून छाप पाडली. किंबहुना गोटखिंडी गावच्या राजकारणातील एक्का म्हणून संपूर्ण तालुकाभर त्यांची ख्याती होती.

तात्यांची गेली ५० वर्षाची राजकीय, सामाजिक व शैक्षणिक कारकीर्द गावच्या विकासाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण ठरली. तात्यांनी त्यांच्या व्यक्तिगत जीवनामध्ये अनेक क्षेत्रांतील वेगवेगळी मानाची पदे भूषवली. त्यामध्ये गोटखिंडी विद्यालयचे मुख्याध्यापक, राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक, गोटखिंडी शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक, इस्लामपूर मार्केट कमिटीचे संचालक, वसंत पाणीपुरवठा संस्थेचे संस्थापक संचालक याबरोबरच अमृतेश्वर नागरी सहकारी पतसंस्था व मा. ना. जयंत पाटील सहकारी दूध उत्पादक संस्था गोटखिंडी या संस्थांची स्थापना केली. अशा विविध संस्था व पदावर कामाच्या अनुभवाची दखल घेऊन ना. जयंत पाटील यांनी त्यांना आपल्या राजारामबापू पाटील इरिगेशन कमिटीचे अध्यक्षपदी संधी दिली. या व अशा विविध पदांवर अभ्यासू व जबाबदारीपूर्ण काम करण्याची पद्धती पाहून ना. जयंत पाटील यांनी तात्यांना राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या कार्यकारी मंडळामध्ये कारखान्याचे अध्यक्ष पी. आर. पाटील व उपाध्यक्ष विजयराव पाटील यांच्यासोबत काम करण्याची संधी दिली.

राजकीय वाटचालीबरोबरच तात्यांचे गावच्या सर्वांगीण विकासाकडे तितकेच लक्ष होते. त्यातील एक उल्लेखनीय प्रसंग म्हणजे गोटखिंडी गावाची आर्थिक प्रगती करण्याचा रास्त हेतू डोळ्यांसमोर ठेवून राजकारण, गट-तट विसरून गावामध्ये लिप्ट इरिगेशन आणण्याच्या कामामध्ये तात्या अग्रभागी होते. इरिगेशनचे बॉन्ड गोळा करण्यापासून ते कृष्णेचे पाणी गावात पडण्यापर्यंत आपली कामगिरी बजावली. राजकीय संस्थांच्या विविध पदावर काम करत असताना त्यामध्ये संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून गावातील अनेक गरजूंना पेन्शन मिळवून दिल्या तसेच गरजूंना घरकुले, रेशनकार्ड आदी सुविधा मिळवून दिल्या. राजारामबापू पाटील उद्योग समूहामध्ये विविध पदांवर काम करत असताना तात्यांनी अनेक गरीब गरजू व हुशार युवकांच्या हाताला कायमस्वरूपी काम मिळवून देण्याचे अतिशय मौलिक कार्य केले. हे कार्य करत असताना कोणत्याही प्रकारची अपेक्षा कोणाकडूनही कधीही केली नाही, हा त्यांचा गुण नवपिढीला मार्गदर्शक ठरेल.

सामाजिक, राजकीय व शैक्षणिक कार्याबरोबरच तात्यांनी आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीवर तितकेच महत्त्व दिले. त्यांना वेळ दिला आणि आपली पुढील पिढी कशी सर्वगुणसंपन्न बनेल त्या पद्धतीने त्यांच्यावर संस्कार केले. तात्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, तीन मुले, सुना व नातवंडे असा मोठा परिवार आहे. एक मुलगा राजेंद्र शेती व्यवसाय व सामाजकारण आहे. दुसरा मुलगा अविनाश व स्नुषा प्रतिभा डॉक्टर आहेत. तिसरा मुलगा विजय हा तात्यांचा राजकीय, सामाजिक व शैक्षणिक वारसा जपत आहेत.

तात्यांचा व त्यांच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीशी माझा लहानपणीपासूनच अतिशय घनिष्ठ संबंध आहे. माझे व्यक्तिमत्त्व घडविण्यामागे तात्यांचे मार्गदर्शन व प्रेरणा कारणीभूत आहे. तात्यांनी ज्याप्रमाणे त्यांच्या मुलांवर सुसंस्कार केले त्याच पद्धतीने माझ्यासारख्या अनेक युवकांवर त्यांनी चांगले सुसंस्कार दिले. त्यामुळेच गावच्या सर्व लोकांच्या हृदयात त्यांनी आपले अढळ स्थान निर्माण केले.

- प्राचार्य शंकर पाटील, - अण्णासाहेब डांगे कॉलेज ऑफ एज्युकेशन, आष्टा

Web Title: A. of Gotkhindi. T. Patil Tatya: Harhunnari personality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.