आटपाडीत काँग्रेस अध्यक्षांच्या घरी गोपीचंद पडळकर यांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:26 IST2021-08-29T04:26:54+5:302021-08-29T04:26:54+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क करगणी : भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी काँग्रेसचे आटपाडी तालुकाअध्यक्ष डी. एम. पाटील यांच्या ...

आटपाडीत काँग्रेस अध्यक्षांच्या घरी गोपीचंद पडळकर यांची भेट
लोकमत न्यूज नेटवर्क
करगणी : भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी काँग्रेसचे आटपाडी तालुकाअध्यक्ष डी. एम. पाटील यांच्या घरी भेट देत राजकारणापलीकडच्या मैत्रीचे दर्शन घडवले. मात्र या भेटीने तालुक्यात चर्चांना ऊत आला.
आमदार पडळकर शुक्रवारी आटपाडीत आले असता, आटपाडी शहर मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष नीलेश गायकवाड यांनी, बैलगाडी मालकांच्या बाजूने भूमिका घेतल्याबद्दल पडळकरांच्या सत्काराचे आयोजन केले होते. याचवेळी पडळकरांचे मित्र, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डी. एम. पाटील यांचे पुत्र महेश यांनी घरी भेट देण्याची विनंती केली. क्षणाचाही विलंब न करता पडळकर यांनी पाटील यांच्या घरी भेट दिली. यावेळी तालुकाध्यक्षांकडून त्यांचा सन्मान करण्यात आला. दोघांनी विविध विषयांवर चर्चा केली. स्थानिक राजकारणातून निर्माण झालेल्या समस्यांना तोंड देत केलेल्या संघर्षावरही चर्चा झाली.
आमदार पडळकर यांनी जिल्हा उद्योग भवनमधील अधिकारी, विविध योजना व सर्व बँकांचे अधिकारी यांची बैठक घेऊन युवकांना उद्योग उभारण्यासाठी शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याची ग्वाही दिली. नीलेश गायकवाड, अनिल सूर्यवंशी, महेश पाटील यांनी पुढाकार घेऊन युवकांना एकत्रित करण्याचे आवाहन पडळकर यांनी केले. यावेळी प्रमोद क्षीरसागर, प्रवीण क्षीरसागर, माणिक तळे उपस्थित होते.