इस्लामपुरातील गुंड विशाल महाबळ वर्षभरासाठी स्थानबद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:27 IST2021-05-08T04:27:16+5:302021-05-08T04:27:16+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : शहरामध्ये लूटमार, खंडणी आणि मारहाणीसारखे गुन्हे करत दहशत माजविणाऱ्या जावडेकर चौकातील विशाल आनंदा महाबळ ...

इस्लामपुरातील गुंड विशाल महाबळ वर्षभरासाठी स्थानबद्ध
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : शहरामध्ये लूटमार, खंडणी आणि मारहाणीसारखे गुन्हे करत दहशत माजविणाऱ्या जावडेकर चौकातील विशाल आनंदा महाबळ (वय २२) या सराईत गुन्हेगारास पोलिसांनी झोपडपट्टीदादा कायद्याखाली वर्षभरासाठी स्थानबद्ध केले. त्याची रवानगी सांगलीच्या कारागृहात करण्यात आली आहे. यापूर्वी शहरातील पाच गुंडांना या कायद्याखाली कारागृहात डांबण्यात आले आहे.
विशाल महाबळ याच्या नावावर चार गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. शहर आणि परिसरात त्याची प्रचंड दहशत असल्याने त्याच्याविरुद्ध तक्रार देण्यास नागरिक धजावत नव्हते. अशा सराईत गुन्हेगारांवर झोपडपट्टीदादा कायद्याअंतर्गत कारवाई करण्याचे आदेश जिल्हा पोलीसप्रमुख दीक्षित गेडाम, अप्पर प्रमुख मनीषा दुबुुले यांनी दिले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी महाबळ याच्याविरुद्ध झोपडपट्टीदादा कायद्यांतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव पोलीस प्रमुखांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रस्तावाची चौकशी करून गुरुवारी विशाल आनंदा महाबळ याला एका वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले.
या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक डी. पी. शेडगे, हवालदार दीपक ठोंबरे, अरुण पाटील, शरद जाधव, प्रशांत देसाई, अमोल सावंत, आलमगीर लतीफ यांनी भाग घेतला. शहरातील दहशत निर्माण करून सावकारी आणि खंडणी गोळा करणारे आणखी काही गुंड या कारवाईच्या रडारवर असल्याचे देशमुख यांनी स्पष्ट केले.