इस्लामपूर : इस्लामपूर शहरातील फाळकूट गुंडांच्या गुन्हेगारी कारवाया वाढत चालल्या आहेत. त्यातच आज, शुक्रवारी दुपारी कारखाना रस्त्यावरील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या परिसरात तिघा जणांच्या टोळक्याने रेकॉर्डवरील गुंडाचा पाठलाग करत धारदार हत्यारांनी वार करून खून केल्याची घटना घडली. या हल्ल्यानंतर तिन्ही संशयित पोलिसात हजर झाले आहेत. त्यांची नावे समजू शकली नाहीत. खुनाच्या या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली होती. आर्थिक वादातून ही घटना घडल्याची चर्चा आहे. यावर्षातील चौथ्या खुनाची नोंद झाली.रोहित पंडित पवार (२५, रा. बेघर वसाहत, उपजिल्हा रुग्णालयाच्या पाठीमागे, इस्लामपूर) असे खून झालेल्या गुंडाचे नाव आहे. यातील हल्लेखोर हे शहरातीलच आहेत. रोहित आणि हल्लेखोरांमध्ये आर्थिक देवघेवीच्या कारणातून वाद होता. त्यातून हल्लेखोर हे रोहितच्या मागावर होते. शुक्रवारी दुपारी तो कारखाना रस्त्यावर असल्याची माहिती मिळताच हल्लेखोरांनी त्याला गाठले. हल्ल्याची भुणक लागताच रोहितने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र हल्लेखोरानी त्याचा पाठलाग करत हल्ला केला. धारदार शस्त्राने त्याच्या मानेवर आणि डोक्यात वार करून त्यांनी पलायन केले. डोक्यात वार केल्यावर ते हत्यार रोहितच्या डोक्यातच रुतून बसले होते. त्याच अवस्थेत त्याला दुचाकीवरून रुग्णालयात आणण्यात आले.
त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले. मात्र अति रक्तस्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा मोठा फोजफाटा रुग्णालयात दाखल झाला होता. तसेच बेघर वसाहतीमधील युवक आणि मृताच्या नातेवाईकांनी गर्दी केली होती.
आई-बापाविना पोरका..खून झालेला रोहित पवार हा आई-बापाविना पोरका असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे तो किरकोळ स्वरूपाची गुन्हेगारी कृत्ये करण्याकडे वळला होता. त्यातून त्याच्या नावावर काही गुन्हे नोंद असल्याचे समजते. त्याला नशेखोरीचीही सवय होती. दहशत माजवून गुंडगिरी करण्याची त्याची सवय आज त्याला मृत्यूच्या वाटेवर घेऊन गेली.