भेसळीच्या संशयावरून साडेतीन लाखांचा माल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:29 IST2021-09-18T04:29:29+5:302021-09-18T04:29:29+5:30

सांगली : अन्न व औषध प्रशासन विभागाच्यावतीने सांगली, मिरजेतील दूध डेअरी, बेकरीचा कच्चा माल पुरवठा करणाऱ्या दुकानावर छापा टाकून ...

Goods worth Rs 3.5 lakh seized on suspicion of forgery | भेसळीच्या संशयावरून साडेतीन लाखांचा माल जप्त

भेसळीच्या संशयावरून साडेतीन लाखांचा माल जप्त

सांगली : अन्न व औषध प्रशासन विभागाच्यावतीने सांगली, मिरजेतील दूध डेअरी, बेकरीचा कच्चा माल पुरवठा करणाऱ्या दुकानावर छापा टाकून भेसळीच्या संशयावरून माल जप्त केला. मिरज येथील मालगावे अँड मिल्क प्रोडक्टस या ठिकाणी पनीर, खवा, दूध पावडर, दुधाचे नमुने तपासणीसाठी घेऊन उर्वरित १ लाख ५८ हजार ५२० रुपये किमतीचा साठा भेसळीच्या संशयावरून जप्त केला. बेकरी दुकानांना कच्चा माल पुरविणाऱ्या राम मंदिर चौकातील गणेश ट्रेडर्सवर छापा टाकून नमुने तपासणीसाठी घेत २ लाख २ हजार ७३३ रुपयांचा साठा भेसळीच्या संशयावरून जप्त करण्यात आला आहे.

मिरज एमआयडीसीमधील मालगावे अँड मिल्क प्रोडक्टसने नियमांचे पालन केले नसल्याचे तपासणीत स्पष्ट झाले.

राम मंदिर चाैकात असलेल्या गणेश ट्रेडर्समधून बेकरीसाठी कच्च्या मालाचा पुरवठा केला जातो. या ठिकाणी रिफाईन्ड पामोलिन तेल, टुटी फ्रुटी, करोंदा यांचे नमुने तपासणीसाठी घेत उर्वरित २ लाखांचा साठा जप्त करण्यात आला. या अहवालांचे प्रयोगशाळेकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर कायद्यातील तरतुदीनुसार पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे सहायक आयुक्त (अन्न) सु. आ. चौगुले यांनी सांगितले.

चाैकट

मिठाई दुकानावरही कारवाई

अन्न व औषध प्रशासनाने शहरातील सहा मिठाई दुकानावरही कारवाई केली. मिठाईवर बेस्ट बिफोरचे स्टीकर न लावणाऱ्या दुकानदारांवर ही कारवाई करण्यात आली.

Web Title: Goods worth Rs 3.5 lakh seized on suspicion of forgery