जत तालुक्यात गणवेशामध्ये गोलमाल
By Admin | Updated: October 8, 2015 00:37 IST2015-10-07T23:24:54+5:302015-10-08T00:37:50+5:30
विद्यार्थी वंचित : वाटप झालेले गणवेशही निकृष्ट दर्जाचे, चौकशीची मागणी

जत तालुक्यात गणवेशामध्ये गोलमाल
जयवंत आदाटे - जत -जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुरू होऊन चार महिने पूर्ण होत आले, तरी तालुक्यातील सुमारे बारा ते चौदा शाळेत अद्याप गणवेश वाटप करण्यात आले नाही. ज्या शाळेत गणवेश वाटप झाले आहे, ते निकृष्ट दर्जाचे आहेत. गुणनियंत्रण विभागामार्फत या गणवेशाची तपासणी करावी, अशी मागणी पालकांमधून होत आहे. शाळा व्यवस्थापन समितीची बैठक घेऊन गणवेश म्हणून वाटप करण्यात येणाऱ्या कपड्यांचा रंग व दर्जा निश्चित करणे आवश्यक असते. परंतु शाळा व्यवस्थापन समितीची प्रत्यक्ष बैठक न घेता कागदोपत्री बैठक झाली आहे, असे दाखवून काही शाळेत परस्पर गणवेशाचे कपडे खरेदी करण्यात आले आहेत. गटशिक्षण अधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुखांनी जाणीवपूर्वक या प्रकरणाकडे दुर्लक्ष केले आहे.
मंगळवेढा येथील एका कापड दुकानातून जत तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसाठी गणवेश खरेदी करण्यात यावा, असा तोंडी आदेश गटशिक्षण अधिकारी संजय जावीर यांनी केंद्रप्रमुखांच्या बैठकीत दिला होता. परंतु हा तोंडी आदेश भविष्यात अडचणीचा होईल, याची जाणीव काही शिक्षकांनी जावीर यांना करून दिल्यानंतर त्यांनी हा आदेश मागे घेतला होता, अशी चर्चा आता तालुक्यात होऊ लागली आहे. सर्व शिक्षा अभियानांतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याचा गणवेश खरेदी करण्यासाठी शासन दोनशे रुपये खर्च करत आहे. परंतु जत तालुक्यात वाटप करण्यात आलेल्या एका ड्रेसची किंमत सर्वसाधारणपणे १३० ते १५० रुपये इतकी आहे. उर्वरित पन्नास रुपये खर्च कोणासाठी व कोठे के ला, का त्यावर कोणी डल्ला मारला आहे ते समजून येत नाही. गणवेश वाटपाची सखोल चौकशी झाल्यास या प्रकरणातील गौडबंगाल बाहेर परणार आहे.
जत तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुली व मुले यांची एकूण संख्या २९ हजार ३४२ इतकी आहे. प्रत्येक विद्यार्थ्यासाठी दोनशे रुपयेप्रमाणे मार्च २०१५ मध्ये शासनाने सुमारे ५८ लाख ६८ हजार ४०० रुपये इतके अनुदान जत तालुक्यासाठी दिले होते.
तालुका पातळीवरून केंद्रप्रमुख आणि प्रत्येक शाळेसाठी हे अनुदान वितरित करण्यात आले आहे. परंतु गणवेश खरेदी करून त्यांचे वाटप काही शाळांनी केले नाही. त्यामुळे या शाळेतील विद्यार्थी गणवेशापासून वंचित आहेत, असा आरोप केला जात आहे.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शैक्षणिक दर्जा सुधारून विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढावी म्हणून केंद्र आणि राज्य शासनाच्यावतीने संयुक्तपणे गणवेश वाटप, मोफत पाठ्यपुस्तके व शालेय पोषण आहार दिला जात आहे. काही शाळांनी या नियमांची काटेकोर अंमलबजावणी केली आहे. परंतु तालुक्यातील काही शाळांनी अद्याप गणवेश वाटप केलेले नाहीत. त्यामुळे तेथील विद्यार्थ्यांची उपस्थिती आता दिवसेंदिवस कमी होऊ लागली आहे. जत पंचायत समिती गटशिक्षण अधिकारी संजय जावीर व सभापती लक्ष्मी मासाळ यांच्यात ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कारावरून जुंपली आहे. शालेय पोषण आहारप्रकरणी आमदार विलासराव जगताप यांनी तालुक्यातील सर्व केंद्र प्रमुखांची बैठक घेऊन त्यांच्या उपस्थितीत संजय जावीर यांची कानउघाडणी केली आहे. त्यामुळे जावीर यांची जत पं. स.मधील कारकीर्द दिवसेंदिवस वादग्रस्त होऊ लागली आहे.
आदर्श शिक्षक पुरस्कारावरुन दोघात जुंपली