स्मारक जागेच्या कुंपणात गोलमाल
By Admin | Updated: June 3, 2015 23:47 IST2015-06-03T22:58:47+5:302015-06-03T23:47:46+5:30
मागासवर्गीय समितीचा प्रताप : आज स्थायी समितीसमोर मान्यतेसाठी विषय

स्मारक जागेच्या कुंपणात गोलमाल
सांगली : महापालिकेच्या प्रभाग १६ मधील आरक्षित जागेला कुंपण घालण्याचा विषय वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. मागासवर्गीय समितीने या एकाच कामासाठी दोन प्रस्ताव दिले आहेत. केवळ कामाच्या नावात बदल केल्याने गोलमाल झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. गुरुवारी होणाऱ्या स्थायी समिती सभेत हा विषय मान्यतेसाठी आणण्यात आला आहे.
नागरी दलित वस्ती सुधार योजनेतून महापालिकेला एक कोटी ७५ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. या निधीतून मागासवर्गीय समितीने विविध कामे सुचविली आहेत. त्यापैकी प्रभाग १६ मधील फुले, शाहू, साठे यांच्या नियोजित स्मारकाच्या जागेला कुंपण घालण्याचे १२ लाख ६३ हजार, तर महापालिकेच्या उद्यान आरक्षित जागेसाठी १२ लाख ५९ हजार रुपये खर्चून कुंपण घालण्याचा प्रस्ताव स्थायी समितीकडे मंजुरीसाठी पाठविला आहे. हे दोन्ही प्रस्ताव संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.
कुंपण घालण्याचे काम एकाच जागेवर केले जाणार आहे. एकाच कामासाठी दोन प्रस्ताव कशासाठी पाठविण्यात आले? असा सवाल उपस्थित होत आहे. जागा एकच असेल तर, दोन प्रस्ताव देण्याऐवजी एकाच नावावर कामाचे अंदाजपत्रक तयार करता आले असते; पण मागासवर्गीय दोन अंदाजपत्रक तयार केल्याने गोलमालचा संशय व्यक्त होत आहे.
टिंबर एरियातील एकूण ५० गुंठे जागा असलेल्या या ठिकाणी स्तंभ, महात्मा फुले, आण्णा भाऊ साठे, शाहू महाराज, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अर्धपुतळे बसविण्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. तत्कालीन महापौर कांचन कांबळे यांच्या कार्यकालात २० आॅगस्ट २०१४ रोजी या आराखड्याला महासभेने मान्यता दिली होती.
या स्मारकासाठी राज्य शासनाच्या वारसा व सांस्कृतिक ठेवा योजनेकडे महापुरुषांचे पुतळे बसविण्याचा ४ कोटी ३५ लाख रुपयांचा प्रस्तावही पाठविला आहे. त्यातून १२ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाल्याचे समजते. त्याशिवाय महापालिकेच्या अंदाजपत्रकातही या कामासाठी २५ लाखांची तरतूद केली आहे.
शासनाकडे प्रस्ताव दिला असताना, या कामावर नव्याने खर्च करण्याची घाई मागासवर्गीय समितीला कशासाठी झाली? हे आकलनापलीकडचे आहे. या विषयावर गुरुवारी होणाऱ्या स्थायी समिती सभेत चर्चा होणार आहे. त्यामुळे स्थायी सदस्य या विषयाला मंजुरी देतात का? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)
आरोप चुकीचा : शेवंता वाघमारे
मागासवर्गीय समितीने महापुरुषांच्या पुतळ्यासाठी आरक्षित जागेवर कुंपण घालण्याचा विषय स्थायीकडे पाठविला आहे. एकाच विषयाचे दोन प्रस्ताव दिले असले, तरी त्यात गोलमाल झाल्याचा आरोप चुकीचा आहे, अशी प्रतिक्रिया सभापती शेवंता वाघमारे यांनी दिली. सुरुवातीला मागासवर्गीय समितीला एक कोटीचा निधी मिळणार असल्याचे सांगण्यात आले. त्यातून १२ लाख ६३ हजारांची तरतूद केली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आणखी ७५ लाखांचा निधी वाढवून आला. त्यामुळे कुंपणासाठी आणखी १२.५९ लाखांची तरतूद केली आहे. या कामाचे मूळ अंदाजपत्रक २५ लाखांचे आहे. पूर्वी एक प्रस्ताव दिल्याने त्यात दुरुस्ती करता येणार नव्हती. त्यासाठी दुसरे अंदाजपत्रक तयार केले आहे. महापालिकेने शासनाकडे पुतळ्यासाठी कोणताही प्रस्ताव दिलेला नाही. उलट खासदार निधीतून १२ लाख रुपये मिळाल्याचे वाघमारे यांनी सांगितले.