पाच कोटींच्या विकासकामात गोलमाल
By Admin | Updated: November 13, 2014 23:50 IST2014-11-13T23:46:13+5:302014-11-13T23:50:42+5:30
दिग्विजय सूर्यवंशी : सत्ताधारी, प्रशासनाकडून लुटीचा उद्योग

पाच कोटींच्या विकासकामात गोलमाल
सांगली : महापालिकेतील सत्ताधारी काँग्रेस व प्रशासनाने संगनमताने शासकीय निधीच्या लुटीचा उद्योग सुरू केला आहे. आॅगस्ट महिन्यात स्थायी समिती सभेत सुमारे पाच कोटींची कामे ऐनवेळच्या विषयात मंजूर करण्यात आली आहेत. या कामांची निकड न तपासताच आयुक्तांनीही त्यांना मंजुरी दिली असून, त्यामुळे या कामात गोलमाल झाला असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते दिग्विजय सूर्यवंशी यांनी पत्रकार बैठकीत केला. प्रशासनाने या कामांच्या ई-टेंडर पद्धतीने निविदा काढाव्यात, अन्यथा न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
ते म्हणाले की, शासकीय निधी, तेरावा वित्त आयोग व इतर निधीतील पाच कोटींची कामे सत्ताधाऱ्यांनी कलम ५:२:२ खाली मंजूर केली. स्थायी समितीने आॅगस्ट महिन्यात हा प्रताप केला. वास्तविक कायद्यानुसार अत्यावश्यक कामेच या कलमाखाली मंजूर करता येतात. पण सत्ताधाऱ्यांनी गटारी, रस्ते, चरी बुजविणे अशी कामे मंजूर केली. इस्लामपूर रस्त्यावरील रस्ता दुभाजकात झाडे लावण्याच्या विषयालाही मान्यता दिली. हा रस्ता सार्वजनिक बांधकाम खात्याकडे आहे. त्यावर महापालिकेने अनावश्यक पैसा खर्च केला.
महापालिकेकडे दोनशे ठेकेदार असताना, सत्ताधाऱ्यांनी बगलबच्च्या ठेकेदारांनाच कामांचे वाटप केले आहे, असे सांगत त्यांनी ठेकेदारांची यादीच जाहीर केली. आयुक्तांकडे फेरप्रस्ताव सादर झाल्यानंतर त्यांनी तरी ही कामे रोखण्याची गरज होती. जाहीर निविदा काढून कामांचे वाटप झाले असते, तर त्यातून पालिकेचा फायदा झाला असता. पण आयुक्तांनीही त्याकडे डोळेझाक केली आहे. ही कामे निविदा पद्धतीने द्यावीत, अन्यथा न्यायालयात आव्हान देणार असल्याचे सांगत, राज्य शासनाकडेही तक्रार करणार असल्याचे ते म्हणाले.
कामाच्या दर्जावर नियंत्रण नाही
सध्या साठ कोटींची कामे सुरू झाली आहेत. या कामांचा दर्जा निकृष्ट आहे. त्यावर कोणत्याही अधिकाऱ्याचे नियंत्रण नाही. स्थायीच्या ठरावावर राष्ट्रवादीच्या सदस्यांच्याही सह्या आहेत. पण त्यांनी हे ठराव रद्द करण्याचे पत्र आयुक्तांना दिल्याचे सूर्यवंशी यांनी सांगितले. पाच कोटींच्या कामांतील ठरावावर बाळू गोंधळी यांच्या सर्वाधिक १९, तर राष्ट्रवादीचे सुनील कलकुटगी यांच्या १४ ठरावांवर सह्या आहेत.