उच्चांकी दर देण्यासाठी सोनहिरा कारखाना कटिबद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:28 IST2021-09-26T04:28:28+5:302021-09-26T04:28:28+5:30

वांगी/कडेगाव : कडेगाव-पलूस तालुक्यांसह परिसरातील शेतकऱ्यांचे आर्थिक सबलीकरण व्हावे, या हेतूने दिवंगत माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी वांगी ...

Goldsmith factory committed to high rates | उच्चांकी दर देण्यासाठी सोनहिरा कारखाना कटिबद्ध

उच्चांकी दर देण्यासाठी सोनहिरा कारखाना कटिबद्ध

वांगी/कडेगाव : कडेगाव-पलूस तालुक्यांसह परिसरातील शेतकऱ्यांचे आर्थिक सबलीकरण व्हावे, या हेतूने दिवंगत माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी वांगी (ता. कडेगाव) येथील उजाड माळरानावर सोनहिरा साखर कारखान्याची उभारणी केली. आज कारखाना पूर्णपणे आर्थिक सक्षम आहे. उसाला उच्चतम दर देण्याची परंपरा कायम राखण्यास तो कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन कारखान्याचे संचालक, सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी शनिवारी केले.

डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखान्याची २८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा कारखाना कार्यस्थळावर खेळीमेळीत पार पडली. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष आमदार मोहनराव कदम, उपाध्यक्ष पोपट महिंद, संचालक रघुनाथ कदम, कार्यकारी संचालक शरद कदम आदी उपस्थित होते.

डॉ. कदम म्हणाले, अनंत अडचणींवर मात करून कारखाना सक्षमपणे वाटचाल करीत आहे. आमदार मोहनराव कदम यांच्या मार्गदर्शनाखाली काटकसरीचे धोरण आणि नेटके नियोजन सुरू आहे. कारखाना आर्थिकदृष्ट्या भक्कम झाला आहे. त्याचा फायदा ऊस पुरवठादार, सभासदांना चांगला ऊसदर देण्यासाठी हाेणार आहे. गाळप क्षमता वाढवण्यात आली असून, डिस्टिलरीचेही विस्तारिकरण केले जाणार आहे.

ते म्हणाले की, केवळ साखरेच्या उत्पादनावर अवलंबून न राहता उपपदार्थांच्या उत्पादनात वाढ करून कारखाना आणखी सक्षम केला जाईल. देशातील आणि आशिया खंडातील आदर्श कारखाना म्हणून तो नावलौकिक मिळवेल.

सर्व विषयांना सभासदांनी टाळ्यांच्या गजरात मंजुरी दिली. यावेळी संचालक निवृत्ती जगदाळे, बापूसाहेब पाटील, पी. सी. जाधव, युवराज कदम, सयाजी धनवडे, पंढरीनाथ घाडगे, दिलीपराव सूर्यवंशी, तानाजीराव शिंदे, लक्ष्मण पोळ, अमोल पाटील, जालिंदर महाडिक आदी उपस्थित होते. संचालक पी. सी. जाधव यांनी आभार मानले. कोरोना प्रतिबंधात्मक नियमांमुळे सभेला मोजक्या सभासदांची उपस्थिती होती, तर हजारो सभासद ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते.

Web Title: Goldsmith factory committed to high rates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.