पोपट पाटील यांच्या योगदानामुळेच कबड्डीला सोनेरी दिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:24 IST2021-03-24T04:24:00+5:302021-03-24T04:24:00+5:30
इस्लामपूर व्यायाम मंडळात कुमार गटाचे अजिंक्यपद मिळविणाऱ्या खेळाडूंसमवेत बी. एच. पाटील, कृष्णात पिंगळे, पोपट पाटील, मानसिंग पाटील, मामा ...

पोपट पाटील यांच्या योगदानामुळेच कबड्डीला सोनेरी दिवस
इस्लामपूर व्यायाम मंडळात कुमार गटाचे अजिंक्यपद मिळविणाऱ्या खेळाडूंसमवेत बी. एच. पाटील, कृष्णात पिंगळे, पोपट पाटील, मानसिंग पाटील, मामा इटकरकर.
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : इस्लामपूरसारख्या निम्नशहरी भागात सलग ३५ वर्षे कबड्डीसारख्या देशी मैदानी खेळाला आपले आयुष्य देणाऱ्या शिवछत्रपती पुरस्कार विजेते पोपट पाटील यांचे योगदान अतुलनीय आहे. त्यांच्या योगदानामुळेच इस्लामपूर व्यायाम मंडळाच्या मैदानावर अनेक आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय कबड्डीपटू घडले. त्यांचा हा वारसा सांगली जिल्ह्यासाठी प्रेरणादायी आहे, असे गौरवोद्गार करवीर पंचायत समितीचे माजी सभापती, वडणगेच्या जय किसान मंडळाचे अध्यक्ष बी. एच. पाटील यांनी काढले.
सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या कुमार गटातील जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धेत जयमातृभूमी व सम्राट सांगली आणि अण्णासाहेब डांगे क्रीडा मंडळ शिगाव या संघांचा पराभव करत विजेतेपद पटकाविलेल्या इस्लामपूर व्यायाम मंडळाच्या खेळाडूंचा गौरव बी. एच. पाटील, पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांच्या हस्ते करण्यात आला.
पाटील म्हणाले, मैदानावर येणाऱ्या प्रत्येकाचे आयुष्य समृद्ध होते. पंकज शिरसाट, नरसिंग यादव ही कबड्डी, कुस्तीमधील यशाची प्रतीके आहेत. खेळातून करिअर घडविता येते हे लक्षात ठेवून खेळाडूंनी जिवापाड मेहनत घ्यावी.
पिंगळे म्हणाले, कष्ट, जिद्द आणि आत्मविश्वासातून समाजामध्ये स्वत:ची ओळख निर्माण करा. पराभव झाला तरी चालेल, मात्र ध्येय मोठेच ठेवा. भविष्यामध्ये पोपट पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील इस्लामपूर व्यायाम मंडळाचा स्वतंत्र संघच प्रो-कबड्डीमध्ये खेळेल, इतके मोठे भवितव्य आहे. पोपट पाटील यांनी मंडळाच्या कार्याचा आढावा घेतला. शासनाच्या कृषी विभागात निवड झालेला भाेला मोरे याचा सत्कार करण्यात आला. सतीश मोरे यांनी सूत्रसंचालन केले. सहायक पोलीस निरीक्षक अभिजित पाटील यांनी आभार मानले.
यावेळी सरपंच सचिन चौगुले, सुरेश पोवार, सदाशिव केसरकर, बाजीराव तेवलेकर, मामा इटकरकर, मानसिंग पाटील, प्राचार्य संजय पाटील, आनंदराव वडार, प्रा. संदीप पाटील, प्रशांत घोरपडे, विकास पवार उपस्थित होते.