‘गोकुळ’ जमीनदोस्त; उरल्या आठवणी
By Admin | Updated: May 8, 2015 00:15 IST2015-05-07T23:16:47+5:302015-05-08T00:15:30+5:30
दिग्गजांची हजेरी : अनेक कलाकारांच्या अदाकारींचा ऐतिहासिक साक्षीदार

‘गोकुळ’ जमीनदोस्त; उरल्या आठवणी
अंजर अथणीकर - सांगलीतील तरुण भारत क्रीडांगणासमोर असलेल्या गोकुळ नाट्यगृहाचा ताबा मिळाल्यानंतर महापालिकेने ते जमीनदोस्त केले. यामुळे अनेक कलाकारांच्या अदाकारींचा ऐतिहासिक साक्षीदार आता काळाच्या पडद्याआड गेला आहे.
१९६० च्या दरम्यान महापालिकेने या नाट्यगृहाची उभारणी केली. सुरुवातीला या ठिकाणी राज्यभरातून आलेल्या संस्था नाटके सादर करीत असत. थिएटर तसे शंभर ते सव्वाशे प्रेक्षकांच्याच क्षमतेचे होते. त्यामुळे नाटकासाठी ही जागा अपुरी पडत होती. यानंतर दहा ते पंधरा वर्षांनी याठिकाणी जलसा सुरू झाला. महापालिकेने ही जागा ९९ वर्षांच्या भाडेपट्ट्याने खासगी व्यक्तींना दिली. खासगी व्यक्तींनाही या नाटकाचे भाडे परवडत नसल्यामुळे १९९५ पासून तसे हे नाट्यगृह बंदच होते. महापालिकेने ही जागा परत मागितली. याचा ठेका घेतलेल्या कमलाबाई गवळी यांनी न्यायालयात दाद मागितली. नंतर हा वाद उच्च न्यायालयात गेला व हा दावा महापालिकेने जिंकला. त्यानंतर महापालिकेने ही जागा ताब्यात घेऊन २४ एप्रिल रोजी नाट्यगृह पाडून टाकले. यामुळे इतिहासाचा साक्षीदार काळाच्या पडद्याआड गेला.
ज्येष्ठ संगीतकार बाळ पळसुले यांची कला या थिएटरमध्येच बहरत गेली. त्यानंतर त्यांनी शेकडो चित्रपटांना संगीत देऊन मराठी चित्रपट शौकिनांना मंत्रमुग्ध केले. अभिनेत्री उषा चव्हाण, मधू कांबीकर यांनीही याठिकाणी कला सादर केली आहे. याठिकाणी केवळ नाच-गाण्यांचा कार्यक्रम होत राहिला. यासाठी जयसिंगपूर, इचलकरंजी व विदर्भातूनही नाचे व त्यांच्या पार्ट्या येत. शौकिनांसाठी तीन व पाच रुपये तिकीट होते. पाच रुपयाचे तिकीट काढणाऱ्यांना पुढे खुर्चीवर जागा असे. नृत्यांगनांवर पैशाची उधळण व्हायची. नटून, थटून नाचणाऱ्या महिलांच्या घुंगरांचा खणखणाट रात्री आठ ते एकपर्यंत सुरू असायचा. शहर व परिसरातील शौकिनांची गर्दी असायची. शौकिनांची ने-आण करण्यासाठी याठिकाणी नव्याने रिक्षा स्टॉप झाला. चहाची टपरी, पान दुकानही आले. मात्र शौकिनांनी पाठ फिरवली आणि सर्व खेळ खल्लास झाला.
नाट्यगृह वीस वर्षांपासून बंदच राहिले. चहाची टपरी, पान दुकानाला टाळे पडले. आता रिक्षा स्टॉप तेवढा राहिला आहे आणि त्याचे नाव ‘तरुण भारत रिक्षा स्टॉप’ असे करण्यात आले आहे. आता पाडलेल्या नाट्यगृहाच्या ठिकाणी काय होणार, याकडे सांगलीकरांचे लक्ष लागून राहिले आहे.