गूळ पोहोचला सहा हजारावर
By Admin | Updated: March 1, 2015 23:16 IST2015-03-01T22:59:32+5:302015-03-01T23:16:37+5:30
सरत्या हंगामात शेतकऱ्यांचा फायदा : दर वाढण्याची अपेक्षा

गूळ पोहोचला सहा हजारावर
सहदेव खोत -पुनवत -सरत्या गूळ हंगामात वारणा पट्ट्यातील कणदूर, बिळाशी, कोतोलीतील शेतकऱ्यांच्या गुळाला चांगला दर मिळत असून, शेतकऱ्यांचा फायदा होत आहे. नुकत्याच कऱ्हाड येथे झालेल्या गूळ सौद्यात कणदूर येथील गुऱ्हाळ मालक सुभाष नामदेव पाटील यांच्या १४७ लहान गूळ रव्यांना ४९00 ते ६0१0, माजी सरपंच आनंदराव पाटील यांच्या गुऱ्हाळघरातील शंकर गोविंद पाटील (बिळाशी) यांच्या १५९ लहान रव्यांना ४३00 ते ५000, तर कोतोलीच्या नामदेव पाटील यांच्या गुळास ५३१0 व आर. एस. पाटील यांच्या गुळास ४६१0 असा दर प्राप्त झाला. हे सौदे व्यापारी उत्तमराव भाटवडेकर यांच्याकडे पार पडले.
गुऱ्हाळघरांच्या सरत्या हंगामात गूळ उद्योग शेतकऱ्यांच्या पथ्यावर पडू लागला आहे. मोठ्या रव्यांपेक्षा १0 किलोच्या रव्यांना चांगला दर मिळत असल्याचे चित्र आहे. म्हणून सर्रास गुऱ्हाळघरातून १0 किलोच्या रव्यांचेच उत्पादन घेतले जात आहे. हंगाम आता अंतिम टप्प्यात आल्याने आदनाचा गूळ उतारा वाढला आहे. काही गुऱ्हाळघरात एकेका आदनाला ९ ते १0 रवे (मोठे) पडले आहेत.शिराळा तालुक्यातील हंगाम आता काही दिवसांचाच राहिला आहे, तर शाहुवाडी तालुक्यातील मालेवाडी, कोतोली, रेठरे परिसरात हंगाम महिनाभर चालण्यासारखी स्थिती आहे. अनेक गुऱ्हाळ मालकांचा स्वत:चा ऊस अजून बाकी आहे.
शिराळा व शाहुवाडी तालुक्यातील वारणा पट्ट्यातील गूळ यंदा कोल्हापूरऐवजी कऱ्हाड बाजारपेठेत गेला आहे. कोल्हापूरच्या तुलनेत कऱ्हाडलाच चांगला दर मिळत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. अनेक गुऱ्हाळघरातून कोल्हापूरला यंदा अजिबातच गूळ गेलेला नाही, असे शेतकऱ्यांनी सांगितले.
गुळवे सरसावले
गुळव्यांनी किती कसब वापरुन गूळ बनविला आहे, यावर गुळाचा दर ठरतो. सध्या अनेक गुऱ्हाळघरांतील गुळवे चांगला दर मिळविण्यासाठी धडपडत आहेत. दरायोग्य गूळ बनविण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करीत आहेत. यंदाच्या हंगामात गुळाला ७000 रुपये दर मिळविणारच, असा मनोदय अनेक गुळव्यांनी व्यक्त केला. एकंदरीत गूळ दरात अनेक शेतकऱ्यांना आता फायदा होऊ लागला असून, अशा शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे.