रेल्वेने कर्नाटकात जाताय? आरटीपीसीआर चाचणी करा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:19 IST2021-07-04T04:19:06+5:302021-07-04T04:19:06+5:30
सांगली : महाराष्ट्रातून रेल्वेने कर्नाटकात जाताय? लस घेतलीय? आरटीपीसीआर चाचणी अहवाल आहे? हे सारे प्रश्न तुम्हाला कर्नाटकात गेल्यावर विचारले ...

रेल्वेने कर्नाटकात जाताय? आरटीपीसीआर चाचणी करा!
सांगली : महाराष्ट्रातून रेल्वेने कर्नाटकात जाताय? लस घेतलीय? आरटीपीसीआर चाचणी अहवाल आहे? हे सारे प्रश्न तुम्हाला कर्नाटकात गेल्यावर विचारले जाणार आहेत. त्यामुळे अशी पूर्वतयारी असेल तरच रेल्वेचे तिकीट काढण्याच्या फंदात पडा.
कर्नाटक सरकारने सोमवारी (दि. २८) तसे फर्मानच जारी केले आहे. त्याला अनुसरून मध्य रेल्वेनेदेखील कर्नाटकात जाणाऱ्या प्रवाशांसाठी परिपत्रक काढले आहे. महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या जास्त असल्याने तसेच डेल्टा प्लस व्हेरिएंटचे रुग्ण सापडत असल्याने कर्नाटक सरकारने खबरदारी घेतली आहे. गेल्या वर्षभरापासून कर्नाटकातून मिरजमार्गे सहा एक्स्प्रेस धावत होत्या. १ जुलैपासून आणखी काही गाड्या सुरू झाल्या आहेत. सध्या कर्नाटकातून हुबळी-दादर, दादर-पुद्दुचेरी, यशवंतपूर-अजमेर, यशवंतपूर-गांधीधाम, निजामुद्दीन-वास्को, निजामुद्दीन-यशवंतपूर, मिरज-बंगळुरू आदी गाड्या धावत आहेत. गाड्या वाढल्याने प्रवासीदेखील वाढणार आहेत, त्यामुळे कर्नाटक सरकार सतर्क झाले आहे.
आदेशात म्हटले आहे की, महाराष्ट्रातून कर्नाटकात जायचे असल्यास कोरोना निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक असेल. प्रवास सुरू करण्यापूर्वी ७२ तासांच्या आत आरटीपीसीआर चाचणी करायला हवी. चाचणी प्रमाणपत्र नसल्यास लसीचा किमान एक डोस घेतल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. गाडीत बसताना किंवा कर्नाटकात स्थानकामध्ये उतरल्यावर याची विचारणा होऊ शकते.
चाैकट
चाचणीपेक्षा लसीकरण सोयीचे
सांगली, कोल्हापुरातून बेळगाव, बंगळुरूला नियमित जाणाऱ्या प्रवाशांची संख्या खूपच आहे. प्रत्येक प्रवासापूर्वी ७२ तासांत आरटीपीसीआर चाचणी करणे त्रासदायक ठरेल, त्यामुळे कोरोनाची लस घेणे कधीही सुलभ ठरणार आहे.
कोट
कर्नाटक सरकारने सोमवारी परिपत्रकाद्वारे कोरोना चाचणी किंवा लसीच्या प्रमाणपत्राची सक्ती केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांनी कर्नाटकात जाण्यापूर्वी त्याची व्यवस्था करूनच प्रवास करावा.
- मनोज झंवर, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे