खंडपीठासंदर्भात सुनावणीला जाणार
By Admin | Updated: October 8, 2015 00:38 IST2015-10-07T23:23:47+5:302015-10-08T00:38:54+5:30
वकिलांचा निर्धार : सांगलीत बैठकीत ठोस निर्णयाची मागणी

खंडपीठासंदर्भात सुनावणीला जाणार
सांगली : कोल्हापूर खंडपीठाच्या प्रश्नावर सांगली, कोल्हापुरातील वकिलांनी आंदोलन छेडले असून, माजी न्यायमूर्तींचा पुतळा जाळल्याप्रकरणी ९ आॅक्टोबर रोजी उच्च न्यायालयातील सुनावणीला सर्व वकील उपस्थित राहणार आहेत. बुधवारी सांगली बार असोसिएशनच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
कोल्हापूर खंडपीठासाठी पाच जिल्ह्यातील वकिलांनी कृती समितीच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले होते. खंडपीठाला राज्य शासनाने हिरवा कंदील दाखविला. तत्कालीन उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मोहित शहा हे सेवानिवृत्तीपूर्वी खंडपीठाची घोषणा करतील, अशा आशा होती. पण निवृत्तीवेळी त्यांनी खंडपीठाबाबत कोणताच निर्णय घेतला नाही. याविरोधात कृती समितीने निदर्शने करीत त्यांचा पुतळा जाळला होता. याबाबत उच्च न्यायालयाने पाच जिल्ह्यातील वकिलांना नोटीस बजाविली आहे. त्यावर ९ आॅक्टोबरला सुनावणी होणार आहे. या सुनावणीला कृती समितीसह सर्वच वकिलांनी उपस्थित राहण्याचा निर्णय घेण्यात आला. या सुनावणीवेळी म्हणणे मांडण्यासाठी मुदतवाढ मागितली जाणार आहे. यावेळी कोल्हापूर बार असोसिएशनचे आर. एल. चव्हाण, अॅड. श्रीकांत जाधव यांच्यासह सर्व वकील उपस्थित होते. (प्रतिनिधी)