शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे करा
By Admin | Updated: March 7, 2015 00:00 IST2015-03-06T23:56:29+5:302015-03-07T00:00:51+5:30
अनिल बाबर : नुकसानग्रस्त द्राक्षबागांची पाहणी; भरपाईसाठी पाठपुरावा

शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे करा
विटा : खानापूर मतदारसंघात अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या द्राक्षबागा, व रब्बी पिकांचे प्रशासनाने कार्यालयात बसून पंचनामे करू नयेत. अवकाळीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना प्रत्यक्षात नुकसान भरपाई मिळण्यासाठी प्रशासनाने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीचे पंचनामे करावेत, असे आदेश आ. अनिल बाबर यांनी दिले. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळण्यासाठी राज्य सरकारकडे मागणी करणार असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.
अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या खानापूर तालुक्यातील करंजे, पळशी, हिवरे, बलवडी (खा.) परिसरातील पिकांची पाहणी आ. बाबर यांनी केली. यावेळी त्यांनी ज्या प्रकारचे नुकसान झाले आहे, त्याप्रकारचे वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याच्या सूचना तालुका कृषी अधिकारी व तलाठी यांना दिल्या. यावेळी पंचायत समिती सदस्य पांडुरंग जाधव, राजाभाऊ शिंदे, पोपट माने, संभाजी जाधव, भानुदास सूर्यवंशी, अरविंद पाटील, दिनकर गायकवाड उपस्थित होते.
बाबर यांनी परिसरातील द्राक्षबागांना भेटी दिल्या. नुकसानीचा आढावा घेत अधिकाऱ्यांना सुचना केल्या.
यावेळी माणिक जाधव, शहाजी सूर्यवंशी, पांडुरंग गायकवाड, अरविंद जाधव, धनंजय जोशी, भानुदास सूर्यवंशी, पोपट माने, खंडू माने, सुभाष गायकवाड, राजाराम जाधव, होनराव गायकवाड यांच्यासह ग्रामस्थ, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)