स्वीय निधीतून सहा लाख नव्हे, बारा लाखच द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:29 IST2021-09-21T04:29:44+5:302021-09-21T04:29:44+5:30
सांगली : जिल्हा परिषद स्वीय निधी वाटपावरून पदाधिकारी आणि सदस्यांमध्ये संघर्ष पेटला आहे. सुरुवातीस पदाधिकाऱ्यांनी आपसातच निधी वाटप करून ...

स्वीय निधीतून सहा लाख नव्हे, बारा लाखच द्या
सांगली : जिल्हा परिषद स्वीय निधी वाटपावरून पदाधिकारी आणि सदस्यांमध्ये संघर्ष पेटला आहे. सुरुवातीस पदाधिकाऱ्यांनी आपसातच निधी वाटप करून विकास कामांच्या फायली फिरविल्या होत्या. सदस्य आक्रमक होताच पदाधिकाऱ्यांनी प्रत्येक सदस्याला सहा लाख रुपये देण्याचा प्रस्ताव दिला आहे; पण अनेक सदस्यांनी सहा लाख नकोत, बारा लाख रुपयेच द्या, अशी भूमिका घेतली आहे.
जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांनी ६५ लाख, उपाध्यक्ष शिवाजी डोंगरे ५० लाख, चार समिती सभापतींना प्रत्येकी ४५ लाख अशा पद्धतीने स्वीय निधीचे वाटप करून विकास कामाचे प्रस्ताव तयार केले होते. यापैकी काहींच्या फायलीही फिरल्या होत्या. राष्ट्रवादीचे शरद लाड यांच्यासह भाजपमधील काही सदस्यांनी स्वीय निधीचे समान वाटप व्हावे, अशी भूमिका घेतली होती. प्रत्येक सदस्याला १२ लाख रुपये द्यावेत आणि उर्वरित निधी पदाधिकाऱ्यांनी घ्यावेत, अशी भूमिका सदस्यांनी घेतली आहे. त्यानंतर पदाधिकाऱ्यांच्या विकास कामांच्या फायली थांबल्या आहेत.
प्राजक्ता कोरे यांनी सर्व सदस्यांना प्रत्येक सहा लाखांच्या विकास कामांची पत्रे द्यावीत, अशी मागणी केली आहे. यावर काही सदस्यांनी आक्रमक भूमिका घेत सहा लाख नको, प्रत्येक सदस्याला बारा लाख रुपयेच पाहिजेत, अशी भूमिका मांडली आहे. समान निधीचे वाटप झाल्याशिवाय पदाधिकाऱ्यांनी स्वीय निधी खर्च करू नये, अशी मागणी शरद लाड यांनी केली आहे.
चौकट
पदाधिकाऱ्यांच्या निधी वाटपात कपात : प्राजक्ता कोरे
स्वीय निधी सर्वांना देण्यात येणार आहे. मी स्वत: ६५ लाख रुपयांवरून ४५ लाख रुपये विकास कामांसाठी घेण्याचा निर्णय घेतला आहे. उपाध्यक्ष, सभापतींच्या निधी वाटपातही कपात होणार आहे. प्रत्येक सदस्याकडून सहा लाख रुपयांच्या कामाचे प्रस्ताव मागविले आहेत. पूर्वी प्रत्येक सदस्यांना दीड लाख रुपये दिले आहेत. प्रत्येक सदस्याला जवळपास साडेसात लाख रुपये मिळत आहेत, अशी प्रतिक्रिया प्राजक्ता कोरे यांनी दिली.
चौकट
कोणीही पत्र देऊ नये : शरद लाड
पदाधिकाऱ्यांनी फार तर पाच ते दहा लाख रुपये जादा घ्यावेत. उर्वरित निधीतून प्रत्येक सदस्यांच्या मतदारसंघातील विकास कामांसाठी बारा लाख रुपये मिळणार आहेत. तरीही पदाधिकाऱ्यांनी सदस्यांकडे सहा लाख रुपये कामाचेच प्रस्ताव मागितले आहेत, हे पूर्णत: चुकीचे आहे. एकाही सदस्याने तसे पत्र देऊ नये, असे आवाहन जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादीचे सदस्य शरद लाड यांनी केले आहे.