शिक्षकांना सहाव्या वेतनाचा फरक देणार

By Admin | Updated: February 8, 2015 00:56 IST2015-02-08T00:54:46+5:302015-02-08T00:56:46+5:30

विवेक कांबळे : आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान सोहळ्यावेळी आश्वासन

Give teacher the difference of sixth wage | शिक्षकांना सहाव्या वेतनाचा फरक देणार

शिक्षकांना सहाव्या वेतनाचा फरक देणार

सांगली : महापालिकेने शिक्षकांना सहावा वेतन आयोग लागू केला असला तरी, त्याच्या फरकाच्या रकमेसाठी शिक्षकांचा संघर्ष सुरू आहे. लवकरच महापालिका फरकापोटी ६० ते ७० लाख रुपये शिक्षकांना देण्यात येतील, असे आश्वासन महापौर विवेक कांबळे यांनी शनिवारी आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान कार्यक्रमावेळी दिले.
येथील दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात हा कार्यक्रम पार पडला. याचे उद्घाटन कांबळे यांनी केले. यावेळी ते म्हणाले की, महापालिका सध्या मोठ्या आर्थिक संकटात सापडली आहे. या सर्व संकटाला राज्य शासनच जबाबदार आहे. शिक्षकांसारखे सुजाण लोक जर महापालिकेच्या पाठीशी राहणार असतील, तर शासनाला याप्रश्नी जाग आणण्यास वेळ लागणार नाही. आर्थिक परिस्थिती कमकुवत असली तरी, शिक्षकांच्या सहाव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम निश्चितपणे देण्यात येईल. लवकरच यातील काही रक्कम देण्यात येईल. महापालिकेत यापुढे स्वच्छ आणि पारदर्शी कारभार होईल. हे पद शोभेचे नसून चांगल्या कामासाठीचे आहे, हे आपण सिद्ध करून दाखवू. प्रलंबित प्रश्न मार्गी लावतानाच महापालिका क्षेत्राचा विकास साधला जाईल, असे ते म्हणाले.
राजकारणात काम करीत असताना या पदापर्यंत पोहोचण्यासाठी ३२ वर्षे ७ महिन्यांचा कालावधी गेला. उशिरा का होईना, हे पद मिळाले. आता या पदाच्या माध्यमातून चांगल्या कामाचा ठसा उमटवू, असे ते म्हणाले.
उपमहापौर प्रशांत पाटील म्हणाले की, महापालिकेची आर्थिक परिस्थिती कमकुवत असली तरी, आम्ही चांगल्या पद्धतीने यातून मार्ग काढू. सेवानिवृत्त शिक्षकांसह सर्वांना दिलासा देण्याचे काम यापुढील काळात केले जाईल.
यावेळी सौ. जयश्री यमगर, अतिका बेगम जमादार, अकबर घोडीमार, संगीता महाजन, सुरेखा सत्याण्णा, अनिल पाटील, चित्रा शिंगारे यांना ‘आदर्श शिक्षक’ पुरस्काराने गौरविण्यात आले. माजी शिक्षण समितीचे सभापती मानसिंग शिंदे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. शिक्षक नेते विश्वनाथ मिरजकर, मुकुंद सूर्यवंशी यांनीही भाषणे केली. यावेळी शिक्षक, अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Give teacher the difference of sixth wage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.