आत्मनिर्भर जगण्यासाठी नऊ हजार पेन्शन द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:24 IST2021-03-24T04:24:42+5:302021-03-24T04:24:42+5:30
इस्लामपूर : देशातील खासगी व निमसरकारी क्षेत्रातील ६७ लाख पेन्शनरांना वार्धक्यात आत्मनिर्भर जगता यावे यासाठी नऊ हजार रुपये पेन्शनवाढ ...

आत्मनिर्भर जगण्यासाठी नऊ हजार पेन्शन द्या
इस्लामपूर : देशातील खासगी व निमसरकारी क्षेत्रातील ६७ लाख पेन्शनरांना वार्धक्यात आत्मनिर्भर जगता यावे यासाठी नऊ हजार रुपये पेन्शनवाढ करावी, अशी मागणी हातकणंगले लोकसभा मतदार संघाचे खासदार धैर्यशील माने यांनी लोकसभेत शून्य प्रहरात केली.
संसदेत सुरू असलेल्या अधिवेशनात पेन्शनसारख्या महत्त्वपूर्ण विषयाकडे खासदार माने यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. गेली अनेक वर्षे संपूर्ण देशभर ईपीएस - ९५ पेन्शनधारकांचे आंदोलन सुरू आहे. संपूर्ण देशातील सहकारी संस्था, खासगी कंपन्या व निमशासकीय संस्थांमध्ये ज्या नागरिकांनी कष्टाने प्रामाणिकपणे काम करून या संस्था मोठ्या करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली व देशाची औद्योगिक आर्थिक प्रगती साधनांमध्ये हातभार लावला अशा संपूर्ण देशातील पेन्शनधारकांना सध्या दिली जाणारी पेन्शन ही अत्यंत कमी आहे. तरी या पेन्शनधारकांना प्रतिमहिना ९ हजार रुपयेपर्यंत पेन्शन द्यावी, अशी मागणी लोकसभेत केली.
देशात ७६ लाख इतक्या पेन्शनधारकांना प्रतिमहिना १ हजार ते ३ हजारपर्यंत पेन्शन मिळते. त्यामध्ये त्यांचा उदरनिर्वाह होत नाहीच. पण त्यांच्या औषधांचाही खर्च निघत नाही. त्यामुळे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत व हालाखीचे जीवन हे पेन्शनधारक जगत आहेत. या विषयावर २०१८ साली नेमण्यात आलेल्या श्रम संबंधित संसदीय समितीने दिलेला अहवाल व ईपीएफओच्या संबंधित उच्चस्तरीय समितीने शिफारस केली आहे की ईपीएस ९५ पेन्शन योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या पेन्शनच्या रकमेमध्ये वाढ केली पाहिजे.