क्रांतिसिंहांचे नाव सभागृहाला द्यावे

By Admin | Updated: November 8, 2015 23:39 IST2015-11-08T20:56:24+5:302015-11-08T23:39:49+5:30

अण्णा डांगे : राष्ट्रवादीला घरचा आहेर

Give the name of Krantisinh to the house | क्रांतिसिंहांचे नाव सभागृहाला द्यावे

क्रांतिसिंहांचे नाव सभागृहाला द्यावे

इस्लामपूर : वाळवा पंचायत समितीच्या सभागृहाच्या नामकरणावरून राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये कलगीतुरा रंगला आहे. त्यामध्ये शेतकरी संघटनेपाठोपाठ आज राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अण्णासाहेब डांगे यांनीही सभागृहाला क्रांतिसिंह नाना पाटील यांचे नाव देऊन हा नामकरणाचा वाद संपवावा, असे आवाहन करीत राष्ट्रवादीच्या सत्ताधाऱ्यांना घरचा आहेर दिला.
निवासस्थानी झालेल्या पत्रकार बैठकीत डांगे म्हणाले, दादा आणि बापू राजकीयदृष्ट्या विरोधक असले तरी, सामान्य जनता व सर्वपक्षीयांमध्ये दोघांनाही आदर होता. बापूंच्या आणि दादांच्या कार्यक्षेत्राच्या केंद्रस्थानी असणाऱ्या इस्लामपूर व सांगलीमध्ये त्यांची स्मारके, पुतळे आणि संस्था आहेत. क्रांतिसिंह नाना पाटील हे वाळवा तालुक्याचेच. त्यांनी तुफान सेना, पत्री सरकारच्या माध्यमातून ब्रिटिशांना सळो की पळो करून सोडले होते. त्यांचे नामोनिशाण इस्लामपुरात कोठेच नसावे, हा कृतघ्नपणाच आहे.
क्रांतिसिंहांच्या ऋणातून उतराई व्हायचे की नाही, हे वाळवा तालुक्यातील जनतेने ठरवले पाहिजे. त्यासाठी सर्वांनी विशाल दृष्टिकोन ठेवून त्यांचे मोठे स्मारक करायला हवे. त्याची सुरुवात पंचायत समितीमधील सभागृहाला त्यांचे नाव देऊन करावी, अशी अपेक्षा डांगे यांनी व्यक्त केली. पं. स. आवारातील त्यांचा पुतळा पाहिला की, मनाला वेदना होतात. नामकरणासाठी भांडणाऱ्या दादा-बापू गटाच्या नेत्यांना याची खंत का वाटत नाही? असाही प्रश्न डांगे यांनी उपस्थित केला. (वार्ताहर)


स्वायत्ततेचे राजकारण..!
स्थानिक स्वराज्य संस्थांना ठराव करून त्याची अंमलबजावणी करण्याचे स्वायत्त अधिकार आहेत. मात्र या स्वायत्ततेचा वापर पक्षीय राजकारणासाठी होता कामा नये. परिस्थितीचे वास्तववादी भान ठेवून ठराव करणे आणि त्याची अंमलबजावणी ही नैसर्गिकपणे झाली, तर असे वाद उद्भवणार नाहीत, असेही डांगे म्हणाले.

Web Title: Give the name of Krantisinh to the house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.