बोरगाव : भोसले पिता-पुत्रांनी कृष्णा कारखान्यात केलेला भ्रष्टाचार कागदपत्रांसह मी सभासदांच्या पुढे सादर करतो आहे. तसा मी भ्रष्ट असल्याचा एक तरी पुरावा त्यांनी कागदपत्रांसह जाहीर सभेत सादर करावा, असे आव्हान संस्थापक पॅनलचे संस्थापक अविनाश मोहिते यांनी सहकार पॅनलला दिले.
बोरगाव (ता. वाळवा) येथील शिवाजी चाैकात आयाेजित जाहीर सभेत ते बाेलत हाेते. माेहिते म्हणाले, कोण भ्रष्ट आहे हे जनतेला माहिती आहे. ज्यांना पाच वेळा जनतेने नाकारले आहे, जे कधीच जनतेतून विजयी होऊ शकले नाहीत. त्यांनी आमच्या पराभवाची भाषा करू नये.
मला जनतेने तीन वेळा गुलाल लावला आहे. याचा कदाचीत या भोसले पिता-पुत्रांना विसर पडला आहे.
आम्ही भ्रष्टाचारी आहे अशी वल्गना करणऱ्या भोसले-पिता पुत्रांना जनतेसमाेर येण्याचा अधिकारच नाही. मी व माझे सहकारी निर्दोष असल्याचा पुरावा आम्ही जाहीर सभेत सादर करतो. तसे भोसले यांनी जाहीर सभेत चॅरिटेबल ट्रस्ट हा सभासदांच्या मालकीचा आहे, असा एक तरी पुरावा सादर करावा. पराभव समोर दिसत असल्याची खात्री झाल्यानेच भाेसलेंनी इंद्रजित मोहिते यांना तिसरे पॅनल उभे करण्यास भाग पाडले आहे.
यावेळी बोरगाव, रेठरेहरणाक्ष गटाचे उमेदवार उदयसिंह शिंदे, महेश पवार, शिवाजी पवार, सुरेश चिखलीकर, बंडानाना जगताप, भरतनाना कदम, मानाजी पाटील, जगन्नाथ पाटील, कृष्णात पाटील, भगवान शिंदे, जयसिंग शिंदे व सभासद उपस्थित होते.