चांदोली प्रकल्पग्रस्तांना घरबांधणी अनुदान द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:27 IST2021-05-13T04:27:55+5:302021-05-13T04:27:55+5:30
आष्टा : चांदोली अभयारण्य प्रकल्पग्रस्तांपैकी सुमारे २५० ते ३०० प्रकल्पग्रस्त खातेदारांची घरबांधणी अनुदानातून नावे कमी केली ...

चांदोली प्रकल्पग्रस्तांना घरबांधणी अनुदान द्या
आष्टा : चांदोली अभयारण्य प्रकल्पग्रस्तांपैकी सुमारे २५० ते ३०० प्रकल्पग्रस्त खातेदारांची घरबांधणी अनुदानातून नावे कमी केली आहेत. याबाबत प्रकल्पग्रस्तांच्या वतीने उपवनसंरक्षक सांगली व पुनर्वसन कक्ष इस्लामपूर यांना निवेदन देण्यात आले. तातडीने बैठक घेऊन न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला.
सांगली जिल्ह्यातील आष्टा, तुंग, कसबे डिग्रज, बहादुरवाडी, चिकुर्डे यासह जिल्ह्यातील विविध गावांतील चांदोली अभयारण्यातील प्रकल्पग्रस्तांना वनविभागाच्या वतीने घर बांधणीसाठी एक लाख ६१ हजार ४०० रुपये प्रत्येक खातेदाराला अनुदान देण्यात येणार आहे. मात्र जिल्ह्यातील सुमारे २५० ते ३०० खातेदारांची नावेच या यादीतून रद्द झालेली आहेत. या प्रकल्पग्रस्तांना यापूर्वी दहा हजार रुपये घरबांधणी ॲडव्हान्स म्हणून दिलेले आहेत, अशी वारणा विभागाकडे नोंद आहे. संबंधित खातेदारांना वनविभागाच्या वतीने देण्यात येणारे घर अनुदान तातडीने मिळावे, अशी मागणी करण्यात आली आहे. वनविभागाने लवकरच बैठक घेऊन मार्ग काढावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा प्रकल्पग्रस्त कार्यकर्ते ज्ञानदेव पवार, राम सावंत, शंकर लोखंडे, प्रदीप पवार व प्रकल्पग्रस्तांनी दिला आहे.