आरोग्य कर्मचाऱ्यांना ऑक्टोबरपासून शासकीय सुट्ट्या द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:28 IST2021-09-18T04:28:49+5:302021-09-18T04:28:49+5:30
सांगली : जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांना गेल्या दीड वर्षापासून कोरोनाच्या संकटामुळे शासकीय सुट्ट्यांचा लाभ मिळाला नाही. अनेक कर्मचाऱ्यांना तर साप्ताहिक ...

आरोग्य कर्मचाऱ्यांना ऑक्टोबरपासून शासकीय सुट्ट्या द्या
सांगली : जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांना गेल्या दीड वर्षापासून कोरोनाच्या संकटामुळे शासकीय सुट्ट्यांचा लाभ मिळाला नाही. अनेक कर्मचाऱ्यांना तर साप्ताहिक सुट्टीही मिळत नाही. यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम झाला आहे. म्हणूनच शासनाने दि. १ ऑक्टोबरपासून आरोग्य कर्मचाऱ्यांना शासकीय सुट्ट्या मिळाव्यात, अशी मागणी आरोग्य कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय पाटील यांनी जिल्हा परिषदेकडे केली आहे.
जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांची आरोग्य कर्मचारी संघटनेने भेट घेऊन विविध मागण्या केल्या आहेत. या बैठकीनंतर दत्तात्रय पाटील पत्रकारांशी बोलत होते. ते पुढे म्हणाले, आरोग्य सेविकांना सेवा दिनांकापासून आश्वासित योजनेचा लाभ मिळावा, आरोग्य सहाय्यकांना पदोन्नती मिळाली पाहिजे, प्रत्येक महिन्याच्या एक तारखेपर्यंत पगार झाला पाहिजे, कोरोना काळात जाहीर केलेला प्रोत्साहन भत्ता मिळाला नसल्यामुळे कर्मचारी नाराज आहेत, कोरोना अतिजोखीम काळात सेवक, सेविकांनी काम केल्यामुळे त्यांना तीन वाढीव वेतनवाढी मिळाल्या पाहिजेत, आदी मागण्यांबाबत जितेंद्र डुडी यांच्याबाबत चर्चा झाली आहे.
चौकट
कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत बैठक
आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सर्वच मागण्यांबाबत आठवडाभरात बैठक घेऊन प्रश्न सोडविण्यात येतील. तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांचे सर्वांचे पगार महिन्याच्या एक तारखेपर्यंत करण्यात येतील. याबाबत जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. सुट्ट्यांसह अन्य मागण्यांवरही तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासन जितेंद्र डुडी यांनी दिले आहे.