कोरोनाने पालकांचे छत्र हरविलेल्या मुलांना योजनांचा लाभ द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:18 IST2021-06-18T04:18:20+5:302021-06-18T04:18:20+5:30
सांगली : कोरोनाच्या संसर्गामुळे अनेक बालकांच्या कुटुंबाची वाताहत झाली आहे. जिल्ह्यात कोरोनाने सात बालकांच्या आई, वडिलांचे, २७ बालकांच्या ...

कोरोनाने पालकांचे छत्र हरविलेल्या मुलांना योजनांचा लाभ द्या
सांगली : कोरोनाच्या संसर्गामुळे अनेक बालकांच्या कुटुंबाची वाताहत झाली आहे. जिल्ह्यात कोरोनाने सात बालकांच्या आई, वडिलांचे, २७ बालकांच्या आईचा तर २७४ बालकांच्या वडिलांचा मृत्यू झाला आहे. सर्वेक्षणात ३७० बालके आढळून आली असून ३०८ बालकांचा सामाजिक तपासणी अहवाल नोंद करण्यात आला आहे. उर्वरित बालकांचीही नोंदणी करून अशा बालकांना शासनाच्या विविध योजनांचे लाभ द्यावेत, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले.
बालसंरक्षण हक्क समितीची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. यावेळी ते बोलत होते.
जिल्हाधिकारी डॉ. चौधरी म्हणाले, जिल्ह्यात गेल्यावर्षी मार्च महिन्यात कोरोनाचा बाधित आढळला. तेव्हापासून आतापर्यंत कोरोनामुळे ज्या बालकांनी पालक गमावले आहेत त्यांची माहिती तातडीने संकलित करण्याचे आदेश दिले आहेत. शहरात महानगरपालिका तर ग्रामीण क्षेत्रात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ही माहिती संकलित करण्यात येत आहे.
कोरोनाने पालक गमावलेल्या बालकांच्या मालमत्ता हक्काबाबत कार्यवाही करावी. अशा बालकांचे जे नातेवाईक पालकत्व स्वीकारणार आहेत त्याचीही माहिती घेण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.
यावेळी महिला व बाल विकास अधिकारी सुवर्णा पवार, उपआयुक्त राहुल रोकडे, जिल्हा विधी व सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायाधीश विश्वास माने, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिल्पा पाटील, बाल संरक्षण अधिकारी बाबासाहेब नागरगोजे, तहसीलदार शरद घाडगे, बाल कल्याण समिती अध्यक्षा ॲड. सुचेता मलवाडे यांच्यासह सदस्य उपस्थित होते.
चौकट
आई-वडील गमावलेली बालके तसेच एक पालक गमावलेल्या बालकांचा सांभाळ करण्यासाठी सक्षम नसलेल्या पालकांची माहिती पोलीस प्रशासनाकडे सादर केल्यास त्याबाबत पुढील कार्यवाही करता येणार आहे. शासनाच्या विविध योजनांचा या बालकांना लाभ मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी दिले.