शिराळ्यात गुऱ्हाळांच्या चिमण्या थंडावल्या
By Admin | Updated: April 1, 2015 00:08 IST2015-03-31T23:04:03+5:302015-04-01T00:08:22+5:30
गळिताची सरासरी घटली : अपेक्षित दराअभावी शेतकऱ्यांचा तोटा

शिराळ्यात गुऱ्हाळांच्या चिमण्या थंडावल्या
सहदेव खोत -पुनवत -गेले तीन-चार महिने शिराळा तालुक्यात सुरू असलेल्या गुऱ्हाळांचा हंगाम आता संपला आहे. तालुक्यातील काही गूळ कलमांना मिळालेला पाच-सहा हजाराच्या आसपास, तर कणदूरच्या गूळ मोदकांना मिळालेला नऊ हजाराचा दर वगळता, यावर्षी सर्वच गुऱ्हाळांतील शेतकऱ्यांना सरासरी तीन हजारच दर मिळाल्याने, तोटा झाल्याच्या प्रतिक्रिया शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहेत. शिराळा तालुक्यात गुऱ्हाळ हंगामाची सुरुवात गेल्या दिवाळीदरम्यान झाली. गुऱ्हाळ मालकांनी मोठे भांडवल गुंतवून गळिताला सुरुवात केली. वास्तविक शिराळा तालुक्यातील गुळाला, विशेषत: कणदूरच्या गुळाला चांगला दर्जा असल्याने यावर्षी चांगला दर मिळेल, अशी सर्वांचीच अपेक्षा होती. मात्र शेतकऱ्यांची ही अपेक्षा फोल ठरली.
यावर्षी गूळ दराची सुरुवात प्रति क्विंटल दोन हजारानेच झाली. पहिल्या एक-दोन महिन्यात तर शेतकऱ्यांना २०००, २२००, २४००, २६०० रुपये प्रति क्विंटलला दर मिळाला. त्यामुळे सुरुवातीच्या काळात शेतकऱ्यांची निराशाच झाली. संक्रांतीच्या दरम्यान गूळ भाव वधारण्यास सुरुवात झाली. मात्र गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी दर मिळाला नाही.
तालुक्यातील असंख्य गुऱ्हाळघरे गळिताला ऊस नसल्याने महिन्यापूर्वीच बंद झाली आहेत. तालुक्यात सुमारे २५ गुऱ्हाळ घरांतून यावर्षी सुमारे सव्वालाख टन उसाचे गाळप झाले. मात्र वाढलेला उत्पादन खर्च व गूळ दरात झालेली घसरण यामुळे गुऱ्हाळापेक्षा कारखानेच बरे, अशा भावना अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या.
एकंदरीत गेल्यावर्षी काही कलमे ७००० रुपयांपर्यंत पोहोचली होती. मात्र यावर्षी हा दर ६००० रुपयांच्या आसपासच राहिला, तर सरासरी दर ३००० ते ३५०० रुपयांपर्यंतच राहिला. त्यामुळे शेतकऱ्यांत ‘कही खुशी, कही गम’ अशी परिस्थिती राहिली.
गुऱ्हाळ मालकांची धडपड
अपेक्षित दर नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी गुऱ्हाळातील गळिताकडे यंदा पाठ फिरविली. अशावेळी गुऱ्हाळ उद्योग टिकविण्यासाठी फायद्या-तोट्याचा विचार न करता, शेतकऱ्यांचा उभा ऊस ठरवून घेऊन त्या उसावर काहीकाळ गुऱ्हाळघरे चालवली व कामगारांना गुंतवून ठेवले. शेतकऱ्यांनी सुद्धा नफ्या-तोट्याचा विचार न करता उभा ऊस ठरवून गुऱ्हाळ मालकांना विकून एकरकमी पैसे घेतले.
यावर्षी ३००० ते ३५०० पर्यंतच सरासरी राहिल्याने शेतकऱ्यांसह गुऱ्हाळ मालकांना फटका बसला आहे. अनेकांच्या प्रतिवर्षी दोन लाखांवर निघणाऱ्या गूळपट्ट्या यावर्षी दराअभावी निम्म्यानेच निघाल्या आहेत. दराअभावी यावर्षीचा हंगाम तोट्यात गेला आहे.
- प्रदीप पाटील, गुऱ्हाळ मालक, कणदूर