दरीबडचीत महिलेसह मुलीचा खून

By Admin | Updated: June 7, 2014 00:15 IST2014-06-07T00:13:56+5:302014-06-07T00:15:49+5:30

जत तालुक्यात खळबळ : अनैतिक संबंधातून प्रकार घडल्याची शक्यता

Girl murdered with a woman | दरीबडचीत महिलेसह मुलीचा खून

दरीबडचीत महिलेसह मुलीचा खून

दरीबडची : दरीबडची (ता. जत) येथील वन विभागाच्या हद्दीत एका चोवीसवर्षीय गरोदर महिलेसह तीन वर्षाच्या मुलीचा मृतदेह आढळून आला. या दोघींचाही खून झाला असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. या परिसरातून जाणाऱ्या एका व्यक्तीस आज, शुक्रवारी सकाळी सातच्या सुमारास मृतदेह आढळून आले. त्यानंतर जत पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. उशिरापर्यंत या दोन्ही मृतदेहांची ओळख पटली नव्हती. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.
दरीबडची-जालिहाळ खुर्द मार्गावर वनक्षेत्र आहे. या रस्त्यावरच असणाऱ्या पशुवैद्यकीय रुग्णालयासमोर वन विभागाची हद्दी आहे. या परिसरात हे दोन्ही मृतदेह शुक्रवारी आढळून आले. यातील मृत महिला पाच ते सहा महिन्यांची गरोदर असल्याचे निदर्शनास आले. महिलेच्या तोंडावर, डोळ्यालगत, कानाच्या मागील बाजूस हातोडा, चाकूचे घाव वर्मी बसल्याचे दिसत होते. घटनास्थळी प्रचंड रक्तस्राव झाला होता. मुलीच्या तोंडावर हातोडासदृश हत्याराने मारहाण केल्याने तिचे दात पडल्याचे दिसून आले. मुलीच्या नाकावर व गालावरही वर्मी घाव बसले आहेत. वर्मी घाव बसल्याने दोघींचाही जागीच मृत्यू झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली.
मृतदेहांशेजारी पाण्याची बाटली, केळीच्या साली, स्वेटर, टी-शर्ट, रक्ताने माखलेला रूमाल, तर मृतदेहांपासून थोड्या अंतरावर हातोडा, रूमाल, चिवड्याचे दाणे सापडले. मृत महिलेच्या अंगावर हिरवट पांढऱ्या ठिपक्यांची साडी, गुलाबी रंगाचा ब्लाऊज, पायात जोडवी, हातात हिरव्या बांगड्या, उजव्या हातात काळा दोरा बांधलेला आहे. शरीराचा बांधा मध्यम असून रंग गोरा आहे, तर उंची साडेचार फूट आहे. मुलगी रंगाने सावळी असून तिच्या अंगात हिरव्या पट्ट्याचा टी-शर्ट आहे.
अज्ञाताने त्यांना गुरुवारी रात्री उशिरा दरीबडचीच्या वनक्षेत्रात आणून त्यांचा खून केला असावा, अशी शक्यता व्यक्त होत आहे. हा खून अनैतिक संबंधातून झाला असल्याची परिसरात चर्चा सुरू आहे. याबाबत कोतवाल मल्लू कोळी यांनी फिर्याद दिली असून, जत पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत. (वार्ताहर)

Web Title: Girl murdered with a woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.