आरेवाडीच्या कार्यक्रमावरुन घोरपडे गटात नाराजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:56 IST2021-09-02T04:56:58+5:302021-09-02T04:56:58+5:30
कवठेमहांकाळ : आरेवाडी ता. कवठेमहाकाळ येथील बनात बिरोबाच्या साक्षीनं टेंभू योजनेचा कार्यक्रम पार पडला. मात्र महाआघाडीचे घटक पक्ष ...

आरेवाडीच्या कार्यक्रमावरुन घोरपडे गटात नाराजी
कवठेमहांकाळ : आरेवाडी ता. कवठेमहाकाळ येथील बनात बिरोबाच्या साक्षीनं टेंभू योजनेचा कार्यक्रम पार पडला. मात्र महाआघाडीचे घटक पक्ष असलेल्या शिवसेना नेते, टेंभू आणि म्हैशाळ योजनेसाठी अफाट प्रयत्न करणारे माजीमंत्री अजितराव घोरपडे यांना साधे कार्यक्रमाचे निमंत्रण ही दिले नाही. त्यामुळे घोरपडे गटात नाराजीचे सूर उमटले आहेत.
राज्यातील महाआघाडी बनवताना घेतलेल्या आणा-भाकाना मात्र तिलांजली देण्यात आली. त्यामुळे राज्यात असणारी कॉग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादीची महाआघाडी ,तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघात मात्र एकमेकांच्या विरोधात उभी टाकली आहे. पाणी आणि अजितराव घोरपडे हे समीकरण राज्यात सर्वश्रुत आहे. युतीचे शासन असताना अजितराव घोरपडे यांनी दुष्काळी भागाचा पाणी प्रश्न निकालात काढण्यासाठी कृष्णा खोरे महामंडळ स्थापन करण्यात महत्वाची भूमिका बजावली. युती शासनाच्या काळात घोरपडे यांनी म्हैसाळ आणि टेंभू योजनांची कुदळ मारुन योजनेचे पाणी शेतकऱ्याच्या शिवारात फिरवले.
मिरज तालुक्यातील डोंगरवाडी योजना ही अजितराव घोरपडे यांच्या हट्टापायी तत्कालीन अर्थमंत्री जयंत पाटील यांनी निधी देऊन पूर्णत्वाकडे नेली. हे कळंबी येथील एका कार्यक्रमात जयंत पाटील यांनीच आर. आर. पाटील यांच्या साक्षीने बोलून दाखवले, असे घोरपडे गोटात चर्चेचे सूर उमटले आहेत. राष्ट्रवादीने टेंभूचे पाणी पूजन घेतले. परंतु ज्या योजनेसाठी आणि तालुक्याच्या पाणी प्रश्नासाठी घोरपडे यांचे मोठे योगदान आहे. शिवाय ते सद्या महाआघाडी सरकारमध्ये प्रमुख घटक पक्ष असलेल्या शिवसेनेचे कवठेमहांकाळ तालुक्यातील प्रमुख नेते आहेत. किमान त्यांना या कार्यक्रमाचे निमंत्रण देणे आवश्यक होते, असे तालुक्यातील घोरपडे गटाचे कार्यकर्ते बोलत आहेत.
राज्यात महाआघाडी सुखाने नांदत आहे. मात्र कवठेमहांकाळमध्ये या महाआघाडीत बेबनाव अविश्वासाचे व असहकार्यांचे वातावरण आहे. टेंभू आणि म्हैसाळ योजनेचा कार्यक्रम बिरोबाच्या बनात जयंत पाटील, भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांच्या साक्षीने पार पडला. या कार्यक्रमाचे निमंत्रक ह्या तासगाव कवठेमहांकाळच्या आमदार सुमनताई पाटील आणि त्यांची राष्ट्रवादीची टीम होती.
सिंचन योजनांसाठी योगदान असणारे अजितराव घोरपडे या प्रमुख नेत्यास कार्यक्रमास डावलून राष्ट्रवादीने काय साध्य केले, अशीही चर्चा रंगली आहे. विकासाच्या राजकारणावर तरी राजकारण विसरून या नेतेमंडळींनी एकत्र येणे गरजेचे होते. ज्या आर आर पाटील यांनी मतदारसंघाच्या विकासासाठी विद्यमान खासदार संजयकाका पाटील आणि अजितराव घोरपडे यांना एकवेळ सोबत घेतले होते. किमान त्या धोरणात्मक राजकारणाचा आदर्श तरी या कार्यक्रमात घोरपडे यांना बोलावुन तालुक्याला दाखवायचा होता, असे जनतेतून बोलले जात आहे.