सांगलीत इलाही जमादारांच्या स्मृतीनिमित्त ‘गझलांजली’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:28 IST2021-02-11T04:28:19+5:302021-02-11T04:28:19+5:30
सांगली : मराठी गझलविश्वाला आपल्या अनोख्या शैलीने समृद्ध करणारे दिवंगत गझलकार इलाही जमादार यांना श्रद्धांजली म्हणून संगीतकार हर्षित अभिराज, ...

सांगलीत इलाही जमादारांच्या स्मृतीनिमित्त ‘गझलांजली’
सांगली : मराठी गझलविश्वाला आपल्या अनोख्या शैलीने समृद्ध करणारे दिवंगत गझलकार इलाही जमादार यांना श्रद्धांजली म्हणून संगीतकार हर्षित अभिराज, निमंत्रित कवी व मान्यवरांचा ‘गझलांजली’ कार्यक्रम होणार आहे. राजमती सार्वजनिक ग्रंथालय व इलाही जमादार मित्र परिवाराच्यावतीने इलाही जमादारांच्या काही गझला व आठवणी असा हा छोटेखानी कार्यक्रम ११ फेब्रुवारीस आयोजित केला आहे, अशी माहीती माजी महापौर सुरेश पाटील यांनी दिली.
दुधगाव (ता. मिरज) हे गझलकार इलाहींचे मूळ गाव. या गावाशी त्यांची नाळ कायम जोडली गेली. संपूर्ण मराठी गझल विश्वात इलाहींनी आपल्या अलौकिक शब्दांनी व शब्दातील जादूने साहित्य रसिकांच्या मनावर अधिराज्य केले. या कलाकाराच्या आकस्मिक जाण्याने साहित्यविश्वाला धक्का बसला आहे.
सांगलीकर म्हणून आपल्या या कलाकाराला आदरांजली वाहण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला आहे. प्रदीर्घ काळ इलाही जमादार यांचा सहवास लाभलेले प्रसिद्ध संगीतकार हर्षित अभिराज, निमंत्रित कवी व मान्यवरांचा हा कार्यक्रम होणार आहे. अभिराज हेसुद्धा सांगली जिल्ह्याचेच आहेत. काही गझला, आठवणी व किस्से यांचा हा कार्यक्रम आहे. ११ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजता नेमिनाथनगर येथील सांगली ट्रेडर्स सोसायटीच्या सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे. रसिक, कलाकार व कलाक्षेत्रात काम करणाऱ्या सर्व लोकांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन पाटील यांनी केले आहे.