लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : मराठी गझलविश्वाला आपल्या अनोख्या शैलीने साज चढवित साहित्यविश्वात मनसोक्त मुशाफिरी करणारे प्रसिद्ध गझलकार इलाही युसूफ जमादार (वय ७५) यांचे दुधगाव (ता. मिरज, जि. सांगली) येथे अल्पशा आजाराने शनिवारी सकाळी निधन झाले. त्यांच्यावर आज सोमवारी, दिनांक १ फेब्रुवारीला अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. इलाही यांच्या निधनाने मराठी गझलविश्वातला कोहिनूर हरपल्याची भावना साहित्यविश्वातून व्यक्त होत आहे.
इलाही जमादार यांचा जन्म दुधगाव येथे १ मार्च १९४६ रोजी झाला. गझलकार सुरेश भट यांच्यानंतर मराठी गझलविश्वात सर्वाधिक लोकप्रियता मिळविणारे गझलकार म्हणून त्यांना ओळखले जात होते. बरीच वर्षे पुण्यात एका आऊटहाऊसच्या छोट्या खोलीत त्यांनी वास्तव्य केले. दोन महिन्यांपूर्वी तोल जाऊन पडल्याने त्यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर ते दुधगाव येथे त्यांच्या मूळ गावी परतले. नातेवाईकांनी त्यांची सुश्रूषा केली. शनिवारी सकाळी दहा वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
इलाही जमादार यांनी १९६४ पासून काव्यलेखनाला प्रारंभ केला. ते आकाशवाणी आणि दूरदर्शनचे मान्यताप्राप्त कवी होते. विविध मराठी, हिंदी, उर्दू दैनिके व मासिकांतून इलाहींच्या कविता व गझला प्रसिद्ध झाल्या. 'जखमा अशा सुगंधी', 'दोहे इलाहीचे', 'भावनांची वादळे', 'गुफ्तगू' 'सखये' 'अनुराग', 'अनुष्का', 'अभिसारिका', 'माझे मौन' 'मला उमगलेली मीरा' अशा सुमारे २० हून अधिक पुस्तकांची निर्मिती त्यांनी केली. यातील 'जखमा अशा सुगंधी', 'दोहे इलाहीचे' आणि 'भावनांची वादळे' या पुस्तकांनी प्रचंड लोकप्रियता मिळवली. उर्दू व अन्य भाषांमधून अनेक गझलप्रकार त्यांनी मराठीत आणले. काही नव्या गझलप्रकारांची निर्मितीही त्यांनी केली. मराठीसह हिंदी चित्रपटांसाठीही त्यांनी गीते लिहिली. त्यांच्या गीतांवर आधारित हिंदी व मराठीत सांगीतिक कार्यक्रम व नृत्यनाटिका आजही सादर केल्या जातात.
महाराष्ट्रातील अनेक शहरांत तसेच महाराष्ट्राबाहेरही 'जखमा अशा सुगंधी' व 'महफिल - ए - इलाही' या नावाने मराठी, उर्दू काव्यवाचनाचे जाहीर कर्यक्रम त्यांनी सादर केले. अनेक कविसंमेलने व मुशायरे यात सहभाग घेतला होता.
चौकट
'त्या' भेटीचा योग आलाच नाही
दिवंगत प्रसिद्ध गायक एस.पी. बालसुब्रमण्यम यांनी इलाही जमादार यांच्या गझलांवर आधारित 'निशिगंध' या अल्बममधून प्रथमच मराठीत गाणी गायिली होती. या अल्बमचे निर्माते शांतिवन तोडकर व संगीतकार हर्षित अभिराज यांच्यासमोर एस.पी. बालसुब्रमण्यम यांनी इलाही जमादारांच्या लेखनाचे कौतुक करून त्यांच्या भेटीची इच्छा व्यक्त केली होती, पण या दोन दिग्गजांच्या भेटीचा योग कधीच जुळला नाही.