नरवाड-बेडगच्या धडक योजनेला घरघर

By Admin | Updated: February 21, 2015 00:16 IST2015-02-20T23:45:19+5:302015-02-21T00:16:13+5:30

पाणीपट्टी आवाक्याबाहेर : एकेकाळी शेतीला संजीवनी ठरलेल्या योजना आज ‘कोमात’

Gharghar in the clutches of Narwad-Badgha | नरवाड-बेडगच्या धडक योजनेला घरघर

नरवाड-बेडगच्या धडक योजनेला घरघर

दिलीप कुंभार- नरवाड मिरज तालुक्यातील नरवाड आणि बेडगच्या पाणीपुरवठा धडक योजनेला घरघर लागल्याने लाभार्थ्यांच्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.गेल्या ३० ते ४० वर्षांपूर्वी नरवाड आणि बेडगच्या शेती क्षेत्राला पाणी देण्यासाठी आबासाहेब शिंदे (म्हैसाळकर) यांच्या पुढाकाराने धडक योजना सफल झाली. दुष्काळाने होरपळलेल्या बेडग आणि नरवाडला धडक योजना संजीवनी ठरली. कालांतराने हीच धडक योजना शासनाने वसंतदादा साखर कारखान्याकडे वर्ग केली. धडक योजनेमुळे नरवाड आणि बेडगची शेती सुजलाम् सुफलाम् झाली. साखर कारखान्यावेळी ही योजना नेटाने राबविली, मात्र म्हैसाळ प्रकल्पाच्या वेळोवेळी झालेल्या आवर्तनामुळे धडक योजनेकडील नोंदी वेगाने कमी होत गेल्या. शेतीला पाणी देण्याचे क्षेत्र (नोंदी) कमी होत गेल्याने पाणीपट्टी आवाक्याबाहेर गेली. शेतीतून मिळणारे उत्पन्न आणि पाणीपट्टी याचा ताळमेळ बसविताना शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले.परिणामी याचा फटका शेतीस पाणीपुरवठा करणाऱ्या धडक योजनेला पूर्णपणे बसल्याने गेल्या ४० वर्षांपासून म्हैसाळला कृष्णा नदीतून नरवाड ते बेडगपर्यंतच्या सिमेंट पाईप्स जीर्ण होऊन गळतीचे प्रमाण अधिक झाले.
सद्यस्थितीत संबंधित धडक योजनेवरील सर्व साहित्य गंजले असून, पाणी बंदमुळे पोटलाईन टाकण्यासाठी वापरण्यात आलेल्या सिमेंट पाईप गायब होत आहेत. धडक योजनाच बंद पडल्याने योजनेवर कारखान्याने कोणतीही सुरक्षिततेची उपाययोजना केली नसल्याने या योजनेचे बारा वाजले आहेत. २० जानेवारी २०१३ ला विद्युत वितरण कंपनीने थकित वीज बिलामुळे धडक योजनेचा वीजपुरवठा तोडला आहे. यामुळे म्हैसाळ प्रकल्पाचे खंडित झालेले आवर्तन आणि बंद पडलेली धडक योजना या दोन्ही कचाट्यात शेतकरी अडकला आहे. अशीच स्थिती कायम राहिल्यास शेतकऱ्यांची पिके वाळून जाणार आहेत.

लाभार्थी संख्या घटली
नरवाड धडक योजना
नरवाड धडक योजना १२ जुलै १९८५ ला राज्य सरकारकडून सांगलीच्या वसंतदादा सहकारी साखर कारखान्याकडे वर्ग करण्यात आली. यावेळी १५० शेतकरी या योजनेचे सभासद होते, तर ३८५ एकरहून अधिक क्षेत्र ओलीताखाली आले होते, तर २०१३ अखेर केवळ २० शेतकरी लाभार्थी राहिले असून योजनेकडे केवळ ४० एकर क्षेत्राची नोंद राहिली आहे.


बेडग धडक योजना
बेडग धडक योजनेकडे १९८५ मध्ये १४० सभासद होते, तर ४०० एकर क्षेत्र ओलिताखाली आले होते, मात्र २०१३ मध्ये केवळ १५ लाभार्थी उरले असून केवळ ३५ एकर जमिनीची नोंद उरली आहे. ‘म्हैसाळ’ योजनेचे पाणी मिळू लागल्यानंतर जादा पाणीपट्टीमुळे शेतकऱ्यांनी धडक योजनेकडे पाठ फिरवली आहे. परिणामी योजनाच अडचणीत आली आहे.

Web Title: Gharghar in the clutches of Narwad-Badgha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.