कसबे डिग्रज सोसायटीत सत्तेला मिळाली कलाटणी
By Admin | Updated: December 1, 2015 00:11 IST2015-11-30T23:01:26+5:302015-12-01T00:11:06+5:30
‘जयंत’ पॅनेलची बाजी : ‘ग्रामविकास’च्या सातजणांचे राजीनामे

कसबे डिग्रज सोसायटीत सत्तेला मिळाली कलाटणी
कसबे डिग्रज : संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या कसबे डिग्रज (ता. मिरज) विकास सोसायटीच्या निवडणुकीनंतर झालेल्या पदाधिकारी निवडीत नाट्यपूर्ण घडामोडी घडल्या. निवडणुकीत ग्रामविकास आघाडीला १३ पैकी ७ जागा आणि जयंत पॅनेलला ६ जागा मिळाल्या होत्या. पण अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीत जयंत पॅनेलच्या उमेदवारांना सात मते मिळाली. त्यामुळे सत्ता जयंत पॅनेलकडे गेली, पण हा धक्का सहन न झालेल्या ‘ग्रामविकास’च्या नेत्यांनी सर्वांना राजीनामे देण्यास सांगितले. त्यामुळे सातजणांनी सहकार उपनिबंधकांकडे राजीनामे दिले. त्यामुळे झालेली नूतन निवड किती काळ टिकणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.कसबे डिग्रज सोसायटी जिंकण्यासाठी थेट आ. जयंत पाटील यांनी लक्ष घालत राष्ट्रवादीतील गटबाजी मिटविण्यासाठी प्रयत्न केले होते, पण यश आले नाही. कॉँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष आनंदराव नलवडे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचे देशमुख, लोंढे, सायमोते, चव्हाण हे गट जयंत विकास आघाडीच्या नावासह आ. पाटील यांचे नेतृत्व मानत एकत्र आले, तर कॉँग्रेसचे माजी जि. प. सदस्य श्रीपाल चौगुले आणि माजी पं. स. सदस्य राष्ट्रवादीचे अजयसिंह चव्हाण ग्रामविकास आघाडीच्या झेंड्याखाली एकत्र आले. या चुरशीच्या निवडणुकीत ग्रामविकास पॅनेलला १३ पैकी ७ जागा मिळाल्या, तर जयंत आघाडीला ६ जागा मिळाल्या. नुकतीच अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची निवडणूक झाली. त्यामध्ये ग्रामविकासकडून सर्वाधिक मतांनी विजयी झालेले रमेश काशीद आणि विपूल चौगुले उमेदवार होते, तर जयंत पॅनेलकडून आप्पासाहेब मासुले आणि वंदना रेगे उभे होते. गुप्त मतदान पद्धतीने मतदान झाले आणि नाट्यमय घटना घडल्या. अध्यक्षपदासाठी मासुले आणि उपाध्यक्षपदासाठी रेगे यांनी सात मते मिळवून बाजी मारली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एस. ए. माळी यांनी काम पाहिले. ‘ग्रामविकास’चा पराभव झाला. यावेळी गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर मात्र नेत्यांच्या आदेशानुसार ‘ग्रामविकास’च्या सातही संचालकांनी सहकार उपनिबंधकांकडे राजीनामे दिले.इकडे जयंत पॅनेलने जल्लोष करत राजारामबापू साखर कारखान्यावरील राजारामबापू पुतळ्यास अभिवादन केले. आ. जयंत पाटील यांनी नूतन पदाधिकाऱ्यांसह नेत्यांचा सत्कार केला.
राजीनामे मंजूर झाल्यानंतर सोसायटीचे संचालक मंडळ अल्पमतात येऊन प्रशासक मंडळाची नेमणूक होण्याचे संकेत दिसत आहेत. याबाबत उपनिबंधकांकडून पुढील आठवड्यात पाच तारखेला संचालक मंडळाची बैठक होणार आहे. जर राजीनामे मंजूर झाले तर, संचालक मंडळाचे नूतन पदाधिकाऱ्यांचे अधिकार काय राहणार, प्रशासक नेमले तर काय होणार, प्रशासक मंडळ कोणाचे, असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. (वार्ताहर)
राजकीय संघर्ष : प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष
ग्रामविकासच्या सातहीजणांनी राजीनामे दिल्याचे अध्यक्षपदाचे उमेदवार रमेश काशीद व विपुल चौगुले यांची माहिती.
जयंत पॅनेलच्या सहाजणांचे संचालक मंडळ टिकणार का, याबद्दल प्रश्नचिन्ह.
आनंदराव नलवडे यांचे नेतृत्व मानत राष्ट्रवादीच्या चार-पाच गटांनी पदाधिकारी निवडणूक जिंकली. त्यामुळे आनंदराव नलवडे ठरले किंगमेकर.
ग्रामविकासने निवडणुकीत बहुमत मिळवूनही सत्ता गमावली. समर्थक कार्यकर्ते नाराज.
प्रशासक मंडळ आले तर नूतन संचालक, पदाधिकारी निवडी टिकणार का, याची चर्चा.