लस घ्या अन्यथा रेशनचे धान्य नाही, ग्रामपंचायतीचे दाखले विसरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:28 IST2021-09-18T04:28:25+5:302021-09-18T04:28:25+5:30
लिंगनूर : कोरोनाची लस घ्या, नाही तर रेशनचे धान्य आणि ग्रामपंचायतीचे कोणतेही दाखले मिळणार नाहीत असा इशारा चाबुकस्वारवाडी (ता. ...

लस घ्या अन्यथा रेशनचे धान्य नाही, ग्रामपंचायतीचे दाखले विसरा
लिंगनूर : कोरोनाची लस घ्या, नाही तर रेशनचे धान्य आणि ग्रामपंचायतीचे कोणतेही दाखले मिळणार नाहीत असा इशारा चाबुकस्वारवाडी (ता. मिरज) ग्रामपंचायतीने दिला आहे. गावात प्राथमिक शाळेत शनिवारी (दि. १८) लसीकरण सत्र आयोजित केले आहे.
लसीकरणाला ग्रामस्थांचा प्रतिसाद चांगला नाही. बहुतांश लोक वाड्या-वस्त्यांवर राहतात. गावात राहणारी लोकसंख्या मोजकीच आहे. त्यामुळे लस घेण्यासाठी शेतातून गावात येण्यास ग्रामस्थ टाळाटाळ करतात. बुधवारच्या महालसीकरण मोहिमेतही १०० टक्के ग्रामस्थांचे लसीकरण होऊ शकले नाही. आरोग्य विभागाचे कर्मचारी प्रयत्न करत असले तरी त्यांना ग्रामस्थांची साथ मिळत नाही. लसीविषयी ग्रामस्थांचा गैरसमजही बरेच आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीनेच आता दंडुका उगारला आहे. गाव १०० टक्के कोरोनामुक्त करण्याचा निर्धार केला आहे. ग्रामस्थांना बजावलेल्या नोटिसीत म्हटले आहे की, शनिवारी सकाळी दहा वाजल्यापासून प्राथमिक शाळेत लसीकरण केले जाणार आहे. १८ वर्षांवरील ग्रामस्थांनी तेथे येऊन लस टोचून घ्यावी. लस न घेणाऱ्या कुटुंबांना रेशनचे धान्य दिले जाणार नाही. ग्रामपंचायतीत दाखले किंवा उतारेही मिळणार नाहीत.