शिराळ्यात कूपनलिकेमध्ये अडकलेल्या नागाची सुटका
By Admin | Updated: November 23, 2014 00:43 IST2014-11-23T00:43:46+5:302014-11-23T00:43:46+5:30
दोन तास धडपड : शिराळकरांनी पुन्हा दिली नागप्रेमाची प्रचिती

शिराळ्यात कूपनलिकेमध्ये अडकलेल्या नागाची सुटका
शिराळा : नाग आणि शिराळकरांच्या प्रेमाचे नाते कित्येक वर्षांचे. या प्राण्याला दैवत मानून त्याच्यावर जिवापाड प्रेम करणाऱ्या शिराळकरांची ख्यातीही सर्वदूर पसरलेली आहे. याची प्रचिती देणाऱ्या शेकडो घटना याठिकाणी घडत असतात. जवळपास वीस फूट खोल कूपनलिकेमध्ये अडकलेल्या पाच फूट नागास दोन तासाच्या अथक प्रयत्नानंतर बाहेर काढून त्यास जीवदान देण्याच्या घटनेने या प्रेमाची पुन्हा प्रचिती दिली.
येथील गोरक्षनाथ रस्त्यावरील रमेश कांबळे यांच्या शेतात सहा इंच वीस फूट खोलीची बंद अवस्थेतील कूपनलिका आहे. या कूपनलिकेपासून ४० फुटांवर विहीरही आहे. दुपारी चार वाजण्याच्या दरम्यान विहिरीवरील चालू असणारा विद्युतपंप बंद करण्यासाठी जात असताना विक्रम रमेश कांबळे यांना बंद कूपनलिकेमधून नागाच्या फुत्कारण्याचा आवाज आला. यानंतर या कूपनलिकेमध्ये विक्रम कांबळे, मुबारक नदाफ, अवधूत इंगवले, राजू पाटील, विशाल कांबळे, हमीद आत्तार यांनी बॅटरीच्या सहाय्याने आत पाहिले असता नाग अडकलेला त्यांना दिसला. त्यांनी त्वरित काठी व इतर साहित्याच्या सहाय्याने नागास बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू केला. नदाफ यांनी लोखंडी हूक दोरीच्या सहाय्याने कूपनलिकेमध्ये सोडला. चार ते पाचवेळा प्रयत्न केल्यावर नाग हुकात येऊन अडकला. त्यानंतर दोर वर घेऊन नागास बाहेर काढण्यात आले.
शिराळकर नागांना इजा पोहोचवत नाहीत व मारतही नाहीत, त्यांच्यावर जिवापाड प्रेम करतात. नागपंचमीच नव्हे, तर कोणत्याही वेळेला नाग सापडला तर, त्यास मारत नाहीत. (वार्ताहर)