साहित्यातील अस्सल सोने गावातच : केशव देशमुख
By Admin | Updated: December 2, 2014 00:19 IST2014-12-01T23:21:04+5:302014-12-02T00:19:14+5:30
देशिंग साहित्य संमेलनात प्रतिपादन : कथाकथन, नवोदितांच्या काव्य संमेलनाने रंगत

साहित्यातील अस्सल सोने गावातच : केशव देशमुख
कवठेमहांकाळ : भोवताली घडत असलेले वास्तव साहित्यात आले पाहिजे. वास्तवपूर्ण लिहिण्यासाठी आजूबाजूला नवलेखकांनी पहावे. साहित्यातील अस्सल सोने गावातच आहे. आधुनिकतेचा बाजार मोठा होत असलेल्या काळात लेखकांनी आपलं कसब पणाला लावावे आणि अत्यंत दर्जेदार लिखाण करावे, असे प्रतिपादन नांदेडच्या रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख आणि ज्येष्ठ कवी डॉ. केशव सखाराम देशमुख यांनी व्यक्त केला.
तालुक्यातील देशिंग येथील कवी गो. स. चरणकर यांच्या स्मृतिनिमित्त देशिंग-हरोली ग्रामस्थ आणि अग्रणी प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित १२ व्या अग्रणी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून डॉ. देशमुख बोलत होते. समाजातील कळीच्या प्रश्नाबाबत लेखकांनी नेहमी जागरूकता दाखवावी. समाज आणि लेखक या दोन वेगळ्या बाबी नसतात. लेखणीला कोणताही मेकअप न करता वास्तव मांडा. रंग न लावता मांडलले वास्तव काळजापर्यंत जाते. साहित्य निर्मिती ही अनुभवातून आणि अभ्यासातून झाली पाहिजे. केवळ कल्पनाविलासातून झालेली साहित्य निर्मिती भूक शमवेल; मात्र भुकेचे उत्तर देऊ शकत नाही, असेही देशमुख म्हणाले.
ते म्हणाले, या भागातील लेखक चारुतासागर यांनी मराठी कथेला समृद्ध केले. त्यांनी किती लिहिले यापेक्षा किती कसदार लिहिले, हे पाहणे गरजेचे आहे. गो. स. चरणकर हे या भागातील लोकविद्यापीठ होते.
शिक्षण आणि चळवळ हे दोन विषय लेखकांनी टाळू नयेत. सामाजिक लढाईत वाङ्मयीन गुणवत्ता नष्ट होता कामा नये. आपल्या अवतीभोवती घडते ते आणि त्याच भाषेत लिहिण्याची गरज आहे. दुष्काळाच्या सावलीत वावरत असताना लेखकांनी स्वत:च्या आनंदासाठी लिहून कसे चालेल? असा सवालही त्यांनी विचारला. कविसंमेलनाध्यक्ष विजय चोरमारे यांनी आता गंभीरपणे लिहिणाऱ्या नव्या पिढीची गरज असल्याचे सांगितले. ते म्हणाले, जगण्याचे प्रश्न हे गंभीर होत असताना हलके-फुलके लिहून चालणार नाही. त्यामुळे नवकवींना आपल्या जाणिवा अधिक टोकदार करण्याची गरज आहे.
संमेलनाचे उद्घाटक बांधकाम सभापती गजानन कोठावळे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी अग्रणी प्रतिष्ठानच्यावतीने डॉ. देशमुख यांच्याहस्ते भरत खराडे यांना ‘देशिंग भूषण’, प्रा. वैजनाथ महाजन यांना ‘अग्रणी साहित्य साधना’, तर ‘अग्रणी उत्कृष्ट कथासंग्रह पुरस्कार’ हिम्मत पाटील यांना, तसेच ‘अग्रणी उत्कृष्ट कवितासंग्रह पुरस्कार’ लता ऐवळे यांना देण्यात आला. कवी दयासागर बन्ने यांच्या ‘पडझड’ या कवितासंग्रहाचे, ‘प्रिय हायकू’च्या दुसऱ्या आवृत्तीचेही प्रकाशन झाले.
कविसंमेलनात चंद्रकांत देशमुख, सतीश लोखंडे, लवकुमार मुळे, ऋतुता माने, निर्मला लोंढे, रमजान मुल्ला, मनीषा पाटील, रघुराज मेटकरी, अभिजित पाटील, नामदेव भोसले, गोपाळ पाटील, दयासागर बन्ने, आबासाहेब शिंदे, एम. बी. जमादार, सुलभा कोष्टी यांच्यासह नवोदित कवींनी काव्यवाचन केले. कथाकार नामदेव माळी यांच्या अध्यक्षतेखाली कथाकथनाचे बहारदार सत्र झाले. (वार्ताहर)