रेल्वेतून जनरल प्रवासाला अजूनही रेड सिग्नलच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:18 IST2021-06-21T04:18:29+5:302021-06-21T04:18:29+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : राज्यातील जिल्हाबंदी शिथिल होताच रेल्वे प्रवाशांची गर्दी वाढू लागली आहे. रेल्वेचा प्रवास अजूनही आरक्षित ...

General travel by train is still a red signal | रेल्वेतून जनरल प्रवासाला अजूनही रेड सिग्नलच

रेल्वेतून जनरल प्रवासाला अजूनही रेड सिग्नलच

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : राज्यातील जिल्हाबंदी शिथिल होताच रेल्वे प्रवाशांची गर्दी वाढू लागली आहे. रेल्वेचा प्रवास अजूनही आरक्षित प्रवाशांसाठीच आहे. सामान्य प्रवाशांसाठी प्लॅटफार्मचे तिकीटही ५० रुपयेच आहे.

लॉकडाऊन काळात रेल्वेस्थानकात प्रवाशांची अनावश्यक गर्दी होऊ नये यासाठी प्लॅटफार्म तिकिटांचे दर ५० रुपये करण्यात आले. यापूर्वी ते फक्त १० रुपये होते. कोरोनामुळे गर्दीवर नियंत्रण आणणे गरजेचे होते. मिरजसारख्या जंक्शन स्थानकात चोवीस तास मोठी गर्दी असते; पण प्लॅटफार्म तिकीट दरवाढीचा चांगला परिणाम झाला. गर्दी एकदम कमी झाली. निवांत फिरण्यासाठी म्हणून स्थानकात येणाऱ्यांना चाप बसला. मिरज व सांगली स्थानक प्रशासनाने तर प्लॅटफार्म तिकिटांची विक्रीच बंद केली. मार्च २०२०पासून मार्च २०२१पर्यंत एकही प्लॅटफार्म तिकीट विकले नाही. फक्त आरक्षित तिकीटधारकालाच स्थानकात प्रवेश दिला. तिकीट कन्फर्म असेल तरच रेल्वेतून प्रवासासाठी हिरवा कंदील दर्शवला. यामुळेही स्थानकातील गर्दी प्रचंड ओसरली. गाडीच्या वेळेतच गजबज असायची, उर्वरित वेळेत शुकशुकाट राहिला.

प्लॅटफार्म तिकिटासाठी मागणी वाढल्याने मिरज, सांगलीत मार्च २०२० पासून विक्री सुरू करण्यात आली. महिला, वृद्ध प्रवाशांसोबत मदतीसाठी स्थानकात येणाऱ्यांना प्रवेश आवश्यक होता. त्यांच्यासाठी प्लॅटफार्म तिकिटे देण्यात आली. किंमत मात्र अजूनही ५० रुपयेच आहे. त्यामुळे स्थानकात विनाकारण येणाऱ्यांना शह बसला.

बॉक्स

प्रवासी हळूहळू वाढताहेत

सध्या राज्यभरातील जिल्हाबंदी उठताच प्रवाशांची गर्दी वाढू लागली आहे. जुलैपासून महिन्यात काही गाड्यादेखील वाढविण्याचे रेल्वेने जाहीर केले आहे. सध्या फक्त आठ प्रवासी एक्स्प्रेस गाड्या धावत आहेत. जुलैमध्ये कोल्हापूर-निजामुद्दीन, मिरज बेंगळुरू आदी गाड्या धावतील.

बॉक्स

दररोज सरासरी २५० तिकिटे

सध्या फक्त आरक्षित तिकिटे उपलब्ध आहेत. जनरल श्रेणीची तिकिटे मिळत नाहीत. मिरज स्थानकातून दररोज सरासरी २५० तिकिटे आरक्षित होतात असे प्रशासनाने सांगितले. यामध्ये बहुतांश प्रवाशी उत्तर भारतातील आहेत. दिल्ली, अहमदाबाद, जोधपूर, अजमेरकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त आहे. तिकीट कन्फर्म असणाऱ्यांनाच प्रवेश मिळतो. प्लॅटफार्म तिकिटांची विक्री मात्र अत्यल्प आहे.

कोट

गाड्या पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासंदर्भात अद्याप कोणत्याही सूचना रेल्वे बोर्डाकडून मिळालेल्या नाहीत. सध्या फक्त आरक्षित तिकीटधारकांनाच प्रवेश मिळतो. प्लॅॅटफार्म तिकीट ५० रुपयांना विक्री सुरू आहे. जुलै महिन्यात काही गाड्या वाढवण्याचे नियोजन आहे. पॅसेंजर गाड्यांबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. तूर्त एक्स्प्रेस गाड्याच धावत आहेत. गाड्यांबाबत निर्णय झाल्यानंतर प्रवाशांना माहिती दिली जाईल.

- मनोज झंवर, जनसंपर्क अधिकारी

पॉइंटर्स

मिरज स्थानकातून दररोज धावणाऱ्या गाड्या आठ

रोज प्रवास करणाऱ्यांची संख्या सुमारे १२००

ग्राफसाठी

सांगलीत अनारक्षित तिकिटातून कमाई

२०१८-१९ ४,५४,३३६

२०१९- २० ३,७८,७५५

२०२०- २,१०,०००

Web Title: General travel by train is still a red signal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.