सांगलीत २ रोजी इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर्सचे महाअधिवेशन
By Admin | Updated: April 30, 2015 00:21 IST2015-04-29T23:35:45+5:302015-04-30T00:21:49+5:30
शीतल शहा : केंद्रीय ऊर्जामंत्र्यांच्याहस्ते उद्घाटन

सांगलीत २ रोजी इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर्सचे महाअधिवेशन
सांगली : फेडरेशन आॅफ इलेक्ट्रीक कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनच्यावतीने (फेकॅम) येथे २ मेपासून ‘ऊर्जा प्रकाशोत्सव २०१५’ हे राज्यस्तरीय महाअधिवेशन होणार आहे. तीन दिवस चालणाऱ्या या महाअधिवेशनाचे उद्घाटन केंद्रीय ऊर्जामंत्री पियुष गोयल आणि राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याहस्ते होणार आहे, अशी माहिती ‘फेक ॅम’चे अध्यक्ष शीतल शहा यांनी दिली.
सांगलीत विष्णुदास भावे नाट्यगृहात होणाऱ्या या महाअधिवेशनाच्या उद्घाटन समारंभास अध्यक्ष म्हणून राज्याचे सहकारमंत्री व पालकमंत्री चंद्रकांत पाटील, प्रमुख पाहुणे म्हणून खासदार संजयकाका पाटील उपस्थित राहणार आहेत. विविध चर्चासत्रांचे तसेच प्रदर्शनाचे आयोजन केले आहे.
महाअधिवेशनात ‘नवीन तंत्रज्ञान, व्यवसायातील संधी’ यावर चर्चासत्रे आयोजित केली आहेत. अधिवेशनास राज्यभरातून इलेक्ट्रीक कॉन्ट्रॅक्टर्स, आर्किटेक्टस्, बिल्डर्स, उद्योजक, कृषितज्ज्ञ उपस्थित राहणार आहेत. यानिमित्त तरुण भारत स्टेडियममध्ये भरवण्यात येणाऱ्या प्रदर्शनात देशभरातील नामवंत औद्योगिक कंपन्या सहभागी होणार आहेत.
फेडरेशन आॅफ इलेक्ट्रीक कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशन ही राज्यातील जिल्हा संघटनांची शिखर संस्था आहे. राज्यभरात १३००० पेक्षा जास्त परवानाधारक विद्युत ठेकेदार आहेत. या संघटनेशी राज्यातील २१ जिल्हा संघटना संलग्न आहेत. या सर्व संघटनांचे पदाधिकारी, सदस्य, तसेच राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील इलेक्ट्रीकल कॉन्ट्रॅक्टर्स व सल्लागार, शासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
दि. ४ मे रोजी दुपारी १२.३० वाजता सार्वजनिक बांधकाम विभागाकडील मुख्य अभियंता (विद्युत) संदीप पाटील यांच्या उपस्थितीत समारोप होणार आहे. यावेळी वरिष्ठ कायदेतज्ज्ञ अॅड. प्रदीप देशमुख उपस्थित राहणार आहेत. सिकंदर अत्तार, मोहन हुन्नूर, प्रशांत पाटील, मेहबूब शिरोळकर, अमोल संकपाळ, सौ. गौरी बर्वे, अभी कुलकर्णी, महेश चिपलकट्टी, रवींद्र चौधरी, अभिजित भोसले, संजय कोडग, वाय. के. पाटील, मिलिंद कुलकर्णी, प्रमोद पत्की, अजित सूर्यवंशी, आय. जी. पाटील, अशोक चव्हाण संयोजन करीत आहेत. (प्रतिनिधी)