गॅस्ट्रोसदृश आजाराने वृध्दाचा मृत्यू

By Admin | Updated: November 21, 2014 00:26 IST2014-11-20T22:44:20+5:302014-11-21T00:26:33+5:30

मिरजेतील घटना : साथीच्या आजाराने अनेकजण रुग्णालयात

Gastroscopic illness deaths of the elderly | गॅस्ट्रोसदृश आजाराने वृध्दाचा मृत्यू

गॅस्ट्रोसदृश आजाराने वृध्दाचा मृत्यू

मिरज : मिरज शहरात गॅस्ट्रोसदृश आजाराने अस्लम नदाफ (वय ६५) या वृध्दाचा मृत्यू झाला; मात्र महापालिका आरोग्य विभागाने शेख यांचा मृत्यू अन्य आजाराने झाल्याचा दावा केला. दूषित पाणी पुरवठ्यामुळे उलट्या व जुलाबामुळे अनेकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
वेताळनगर येथील अस्लम नदाफ यांना उलट्या, जुलाबाचा त्रास सुरू होता. आज सकाळी त्यांचा मृत्यू झाला. नदाफ यांच्या मृत्यूनंतर आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी वेताळनगर परिसरात रुग्णांचे सर्वेक्षण केले. महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. रोहिणी कुलकर्णी यांनी शेख यांचा जुलाब व अन्य आजारांमुळे मृत्यू झाल्याचे सांगितले. गेले काही दिवस दूषित पाण्याचा पुरवठा सुरू असल्याने उलट्या व जुलाबाने या परिसरातील अनेक रुग्णांवर उपचार सुरू आहेत. नदीवेस, वखारभाग, परिसरातही दूषित पाणी व अस्वच्छतेमुळे साथीच्या आजाराने नागरिक त्रस्त आहेत. शहरात अनेक ठिकाणी दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रोसदृश आजाराची लागण झाल्याने रुग्णालयात उपचार सुरू आहेत. महापालिकेच्या जलवाहिनीत सांडपाणी मिसळून दूषित पाणीपुरवठा होत असल्याने उलट्या व जुलाबाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आहेत.
भारतनगर, हडको कॉलनी, उद्गाव वेस, नदीवेस, वैरण बाजार, गुरुवार पेठ परिसरात नळाद्वारे दूषित पाणी येत आहे. शहरात अनेक ठिकाणी ड्रेनेजसाठी रस्ते खोदण्यात आले आहेत. खोदकाम करताना जलवाहिन्यांना मोठ्याप्रमाणात गळती लागली आहे. मात्र जलवाहिन्यांची दुरूस्ती न करता ड्रेनेज वाहिन्यांचे काम आटोपण्यात आल्याने मोठ्याप्रमाणात सांडपाणी पिण्याच्या पाण्यात मिसळत आहे. रस्त्यावर कचऱ्याचे ढीग साचले असून, त्याच्या दुर्गंधीमुळे नागरिक हैराण आहेत.
आठ ते दहाजणांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. रुग्णांमध्ये बालके, महिला व वृध्दांचा समावेश आहे. दूषित पाण्यामुळे उलट्या व जुलाबाच्या तक्रारी असलेल्या रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असताना, महापालिका प्रशासनाने व आरोग्य विभागाने याबाबत दखल घेतली नसल्याने नागरिक संतप्त आहेत. (वार्ताहर)

आरोग्य धोक्यात
दूषित पाणीपुरवठ्याबाबत नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही महापालिकेने दुर्लक्ष केल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याची तक्रार नागरिक करीत आहेत. उलट्या व जुलाबाची लक्षणे असलेल्या सुमारे २५ रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत.

Web Title: Gastroscopic illness deaths of the elderly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.