गॅस्ट्रोचे नव्याने १२ रुग्ण
By Admin | Updated: November 28, 2014 00:06 IST2014-11-27T23:05:06+5:302014-11-28T00:06:38+5:30
ओपीडीत ४५ जण : अजूनही ७२ जणांवर उपचार सुरू

गॅस्ट्रोचे नव्याने १२ रुग्ण
सांगली : महापालिकेने गॅस्टो साथीच्या पार्श्वभूमीवर सांगली व मिरजेत केलेल्या सर्व्हेक्षणात आणखी १२ रुग्ण आढळून आले आहेत. त्यात सांगलीतील पाच, तर मिरजेतील सात जणांचा समावेश आहे. तसेच बाह्यरुग्ण विभागात (ओपीडी)मध्ये ४५ रुग्ण आले होते. त्यांच्यावर औषधोपचार करून घरी सोडण्यात आले आहे. सांगली व मिरजेत आजअखेर ७२ रुग्णांवर शासकीय व खासगी रुग्णालयात उपचार केले जात आहेत.
महापालिका हद्दीत १९ नोव्हेंबरपासून गॅस्टोसदृश साथीने थैमान घातले आहे. गेले दहा दिवस रुग्णांच्या संख्येत वाढच होत गेली. आतापर्यंत सांगली व मिरजेत गॅस्ट्रोची लागण झालेले ५७२ रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी ५०० जणांवर शासकीय व खासगी रुग्णालयात उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. अद्यापही विविध रुग्णालयांत ७२ जण उपचार घेत आहेत.
गुरुवारी पालिकेच्या आरोग्य पथकाने केलेल्या सर्वेक्षणात मिरजेत सात व सांगलीत पाच गॅस्ट्रोचे रुग्ण नव्याने आढळून आले. त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. तसेच ग्रामीण भागातूनही दोन रुग्ण सांगलीच्या खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. बाह्यरुग्ण विभागात आजअखेर ३०० रुग्ण उपचारासाठी आले होते. आज रोजी ८० जणांवर उपचार सुरू आहेत. त्यांना औषधे, गोळ्यांचा पुरवठा केला जात आहे.
मिरजेतील ब्राह्मणपुरी, म्हैसाळ वेस झोपडपट्टी, चांद कॉलनी, इंदिरानगर या परिसरात उपचार शिबिरे सुरु करण्यात आली आहेत. या शिबिरातून ४५३ रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. पालिकेच्या लिंक वर्कर्स, नर्सेस यांच्यामार्फत बाधित भागातील कुटुंबांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे.
सांगली व मिरज शहरात मेडिक्लोरचे वाटप कालपासून सुरू करण्यात आले आहे. शहरातील गॅस्ट्रोला प्रतिबंध करण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी अन्नपदार्थ विक्री करण्यास मनाई करण्यात आली आहे. शहरातील हातगाडी, फेरीवाल्यांवर गेल्या चार दिवसांपासून बंदी घातली आहे. त्यामुळे शहरातील चौक रात्रीच्या सुमारास सामसूम आहेत.
मिरज शहरात रिक्षाद्वारे नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे. पाणी उकळून प्यावे, उघड्यावरील व शिळे अन्न खावू नये, जेवणापूर्वी व शौचास जाऊन आल्यानंतर साबणाने हात स्वच्छ धुवावेत, असे आवाहन केले जात आहे. (प्रतिनिधी)
साडीचे गठ्ठे अन चादरी
मिरजेत महापालिकेने ड्रेनेज पाईपलाईनमधील गाळ काढण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेतले आहे. बौद्ध वसाहतीतून जाणाऱ्या ड्रेनेज पाईपमध्ये साडीचे गठ्ठे, चादरी, मोठे दगड, प्लॅस्टिक पिशव्या मोठ्या प्रमाणात आढळून आल्या. त्यामुळेच ड्रेनेज तुंबून सांडपाणी रस्त्यावरून वाहत होते. पालिकेने ड्रेनेज स्वच्छ करीत पाईपलाईन पुन्हा प्रवाहित केली आहे.
पाईपलाईन, कनेक्शन बंद
शेतकरी चौक, भोकरे गल्ली, काशीकर मंगल कार्यालय, जामा मशीद, विसापूर गल्ली या परिसरातील पाण्याची पाईपलाईन बंद करून ८५ नळ कनेक्शन बंद करण्यात आली.
मिरजेत ३१ ठिकाणी वॉश आऊट करण्यात आला असून त्यात जिलेबी चौक, यादव बोळ परिसराचा समावेश आहे.
मिरजेतील फाटक आश्रम, ब्राह्मणपुरी, मालगाव वेस, बौद्ध वसाहत, वेणाबाई मठ, उदगाव वेस, आंबेडकर उद्यान, मंगळवार पेठ, पंचशील चौक या परिसरातील ड्रेनेज साफ करून गळती काढण्यात आली.
महापालिकेने आज केलेली कार्यवाही
मिरजेतील शिवाजी चौक, विठ्ठल मंदिर कमानीजवळ, गणेश तलाव उगारे पेंटरजवळ, म्हाडा कॉलनी मगदूम घराजवळ, वडर गल्ली श्रीनिवास रुग्णालयाजवळ, वखार भाग मिरज उपायुक्त निवासस्थानाजवळील पाण्याच्या पाईपलाईनची गळती काढली
यादव बोळ, ब्राह्मणपुरी, विद्यामंदिर शाळेजवळ वॉश आऊट पार्इंट काढून पाईपलाईन स्वच्छ करून घेतल्या
काशीकर मंगल कार्यालय, ईसापुरे गल्लीतील जुन्या पाईपलाईन बंद करून त्या ठिकाणी नव्या पाईपलाईनला पाणी कनेक्शन जोडण्याची कार्यवाही हाती घेतली.
ब्राह्मणपुरी परिसर, गुरुवार पेठ, वखार भाग या परिसरात ओटी टेस्ट केल्या.