मिरजेत गॅस्ट्रोची साथ आटोक्यात
By Admin | Updated: December 1, 2014 00:15 IST2014-11-30T22:24:12+5:302014-12-01T00:15:27+5:30
सर्वेक्षण सुरूच : आणखी आठ रुग्ण उपचारासाठी दाखल

मिरजेत गॅस्ट्रोची साथ आटोक्यात
मिरज : मिरजेत गॅस्ट्रोची साथ नियंत्रणात असून, आज आठ नवीन रुग्ण उपचारासाठी दाखल झाले. महापालिकेच्या आरोग्य विभागाने तीन फिरत्या पथकांद्वारे रुग्णांचे सर्वेक्षण करून त्यांच्यावर उपचार सुरू केले आहेत.
शासकीय रुग्णालयात व खासगी रुग्णालयात आज आठ रुग्ण दाखल असल्याचे सांगण्यात आले. गॅस्ट्रोची साथ नियंत्रणासाठी ब्राह्मणपुरीसह दाट लोकवस्तीच्या परिसरात पाणी पुरवठा विभागाने जुन्या जलवाहिन्यांचा पाणीपुरवठा बंद करून नवीन जलवाहिन्यांद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे. गाळ साचलेल्या जलवाहिन्या धुऊन स्वच्छ करण्यात येत आहेत.
ड्रेनेज विभागामार्फत ड्रेनेज वाहिन्यांच्या साफसफाईचे काम सुरू असल्याने शहरातील दाट वस्त्यांत दूषित पाण्याची तीव्रता कमी झाली आहे.
शहरात पाण्याचे नमुने तपासणीत पिण्यायोग्य आढळले आहेत. मात्र अनेक ठिकाणी अस्वच्छ भांड्यात पिण्याचे पाणी साठविण्यात येत असल्याने दूषित होत असल्याचा दावा पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला. महापालिका आरोग्य विभागातर्फे सर्वेक्षण सुरूच असून, दररोज तीन फिरत्या वैद्यकीय पथकांद्वारे अतिसाराच्या रुग्णांवर उपचार करण्यात येत असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रोहिणी कुलकर्णी यांनी सांगितले.
ग्रामीण भागात धामणी, कर्नाळ, वड्डी व अंकली या गावातील रुग्णांना गॅस्ट्रोची लागण झाल्याचे आढळत आहे. त्यांना उपचारासाठी मिरजेत रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. शहरात दूषित पाण्यामुळे व गॅस्ट्रो साथीमुळे रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांना महापालिकेने प्रतिबंध केला आहे. आठवडाभर व्यवसाय बंद असल्याने विक्रेते हवालदिल आहेत. (वार्ताहर)
३५ रुग्णांवर उपचार सुरू
सांगली, मिरजेमध्ये शनिवारअखेर दाखल झालेल्या ५२ पैकी २१ रुग्णांना उपचारानंतर घरी पाठविण्यात आले आहे. सध्या मिरजेमध्ये २० व सांगलीमध्ये १५ अशा ३५ रुग्णांवर खासगी व शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आज खासगी रुग्णालयात एकही रुग्ण दाखल झाला नाही.