गॅस्ट्रोमुळे मिरजेत एकाचाही बळी नाही!
By Admin | Updated: February 21, 2015 00:16 IST2015-02-20T23:37:06+5:302015-02-21T00:16:49+5:30
आरोग्य अधिकाऱ्यांचा अहवाल सादर : महापालिका प्रशासनाचे न्यायालयात घूमजाव

गॅस्ट्रोमुळे मिरजेत एकाचाही बळी नाही!
मिरज : गॅस्ट्रोच्या साथीने मिरजेत सुमारे १४ जणांचा बळी गेला, पण महापालिका प्रशासनाने मात्र, मिरजेत गॅस्ट्रोची साथ नव्हती व एकाही रूग्णाचा गॅस्ट्रोने मृत्यू झाला नसल्याचा दावा न्यायालयात केला आहे. शहर सुधार समितीने वृत्तपत्रांतील बातम्यांच्या आधारे महापालिकेविरूध्द केलेला दावा फेटाळण्यात यावा, असे म्हणणे महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. रोहिणी कुलकर्णी यांनी न्यायालयात सादर केले आहे. नोव्हेंबर महिन्यात मिरजेत गॅस्ट्रोच्या साथीमुळे अनेकांचा बळी गेला. दूषित पाण्याने हजारो नागरिकांना रूग्णालयात उपचार घ्यावे लागले. दूषित पाणीपुरवठ्यामुळे गॅस्ट्रोची लागण होऊन मिरजेतील चौदा जणांचा गॅस्ट्रोने मृत्यू झाल्याबद्दल शहर सुधार समितीने महापालिका आयुक्त अजिज कारचे यांच्यावर फौजदारी दाखल करून, आयुक्तांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी न्यायालयात केली आहे. याबाबत न्यायालयाने म्हणणे सादर करण्याचा आदेश दिल्यानंतर गेले तीन महिने टाळाटाळ करणाऱ्या महापालिकेने, मिरजेत गॅस्ट्रोची साथच नव्हती, केवळ जुलाब व उलट्या अशी लक्षणे असलेल्या ६८२ रूग्णांवर उपचार करण्यात आल्याचा पवित्रा न्यायालयात घेतला आहे. १९ नोव्हेंबरपासून जुलाब व उलट्या या लक्षणांमुळे ब्राह्मणपुरी, विजापूर वेस, दिंडी वेस, वखार भाग, कोकणे गल्ली, उदगाव वेस, पंचशीलनगर, गुरूवार पेठ, समतानगर परिसरातील ६८२ जणांवर रूग्णालयात उपचार करण्यात आले. अतिसार रोखण्यासाठी शहरात रूग्णांचे सर्वेक्षण, उपचार, ५०४० कुटुंबांना मेडीक्लोअरचे वाटप, उघड्यावर खाद्यपदार्थ तयार करण्यास व विक्रीस प्रतिबंध करण्यात आला. जुन्या जलवाहिन्या धुऊन काढण्यात आल्या. जुन्या जलवाहिन्यांद्वारे होणारा पाणीपुरवठा बंद करण्यात आला. ३१० ठिकाणी जलवाहिन्यांची गळती काढण्यात आली. शहरात ८०९ पाण्याचे नमुने तपासण्यात आले. त्यापैकी ७६० पिण्यायोग्य व ४९ पिण्यास अयोग्य आढळले. पाणी अशुध्द आढळलेल्या ठिकाणी जलवाहिन्यांची दुरूस्ती करून, पाणी उकळून-गाळून पिण्याबाबत जनजागृती व प्रबोधन केले. प्रतिबंधक उपाययोजना केल्यामुळे कोणीही गॅस्ट्रोचा रूग्ण आढळलेला नाही. अब्दुल लतीफ शेख या वृध्दासह १४ जणांच्या मृत्यूबाबत डॉ. राजेंद्र भागवत यांच्या समितीने चौकशी केली. मात्र एकाचाही मृत्यू गॅस्ट्रोने झाल्याचे आढळले नसल्याचा दावा महापालिका प्रशासनाने न्यायालयात केला आहे. याबाबत वृत्तपत्रांतून प्रसिध्द झालेल्या गॅस्ट्रोमुळे मृत्यू झाल्याच्या वृत्ताला कोणताही वैद्यकीय आधार नसल्याने, वृत्तपत्रांतील बातम्यांच्या आधारे केलेला सुधार समितीचा अर्ज फेटाळण्याची मागणी वैद्यकीय अधिकारी डॉ. रोहिणी कुलकर्णी यांनी केली आहे.
महापालिकेच्या या विश्वामित्री पवित्र्याबाबत जिल्हा सुधार समितीचे वकील अमित शिंदे यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. गॅस्ट्रो साथीबाबत खोटा दावा करणाऱ्या महापालिका प्रशासनाचे न्यायालयात पितळ उघडे पडणार आहे. विधानसभेतील लक्षवेधीवेळी तीन रूग्णांचा मृत्यू झाल्याचेही त्यांनी कबूल केले होते, असे अॅड. शिंदे यांनी सांगितले. (वार्ताहर)
महापालिकेचे घूमजाव
मिरजेतील गॅस्ट्रोच्या साथीत किती बळी गेले व महापालिकेने काय उपाययोजना केल्या, हा प्रश्न आ. अनिल बाबर यांनी विधानसभा अधिवेशनात उपस्थित केल्यानंतर, महापालिका प्रशासनाने कॉलऱ्याची लागण होऊन मिरजेत आनंदा कांबळे यांचा एकच बळी गेला व ग्रामीण भागातील दोन रूग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली होती. मिरजेत एकूण ६८२ रूग्णांवर उपचार करण्यात आले. रूग्णांचे सर्वेक्षण व उपाययोजना करून गॅस्ट्रोची साथ आटोक्यात आणल्याचा दावा केला होता. मात्र असे काही घडलेच नसल्याचा पवित्रा न्यायालयात घेऊन महापालिका प्रशासनाने आश्चर्याचा धक्काच दिला आहे.